जब्बार चीनी, वणी: देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार कधीच गेला आहे. प्रशासन वेळोवेळी प्रसार होऊ नये यासाठी सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर करीत आहे. मात्र ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सूचना आहेत त्याला नागरिकांकडूनच हरताळ फासला जात आहे. वणीतील एका बँकेच्या एटीएमवर चक्क खर्रा खाऊन थुंकण्याचा संतापजनक व तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे बँकेकडून दर दोन तासाला एटीएम निर्जंतुकीरण करण्याच्या नियमालाही हरताळ फासला जात आहे.
बुधवारी संध्याकाळी विराणी टॉकीज परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक गेला असता त्याला एटीएम वर खर्रा थुंकून असल्याचे आढळून आले. त्याने ताबडतोब बँकेत जाउन प्रबंधकाची चांगलीच करनउघाडणी केली. प्रबंधकाने सारवासारव करीत कर्मचारी पाठवून ते साफ करायला लावले. महत्वाचे म्हणजे तिथे सुरक्षारक्षक नव्हता. ‘वणी बहुगुणी’ने जेव्हा रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास भेट दिली असता त्यावेळीही तिथे सुरक्षारक्षक नव्हता.
खर्रा खाऊन थुंकणारा महाभाग कोण?
खर्रा खाऊन एटीएम असो किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा केवळ संतापजनकच नाही तर किळसवाणा प्रकार आहे. थुंकी हा कोरोनाचा सर्वात मोठा वाहक आहे. मात्र चक्क एटीएमवरच थुंकण्याचा प्रकार समोर आल्याने याबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. त्यावरून खर्रा खाऊन थुंकणारा शोधता येऊ शकतो. जर अशा घटनांवर वेळीच आळा बसला नाही तर या घटना वाढू शकतात.
ठेकेदार काय करत आहेत?
एटीएमची जवाबदारी ठेकेदारांना दिली गेली आहे. एटीएमची स्वच्छात त्या ठेकेदारांकडून होणे अपेक्षीत आहे. मात्र वणीतील जवळपास सर्वच एटीएम हे अस्वच्छ आहेत. एटीएमचे कोणत्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्याता आहे. एटीएममध्ये एसी लावणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू हा थंड ठिकाणी अधिक काळ ऍक्टिव्ह राहतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दर दोन तासाला एटीएम मशिन सॅनिटायझरने स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र ठेकेदारांचे याकडे दुर्लक्ष आहे.
बँक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा ठिकाणीही काळजी कशी घेता येईल, याबाबत स्पष्ट करण्यात आले. बँकेच्या एटीएम दर दोन तासांनी सनिटायझरने निर्जंतुक करावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. एटीएम मशीनमध्ये की- बोर्ड, डिस्प्ले, कार्ड टाकण्याचे सॉकेट, पैसे ज्या ठिकाणाहून बाहेर येतात अशा ठिकाणी साफसफाई करण्यात यावी, अशा सूचना आहेत. मात्र बँका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही .
खर्र्याची राजरोसपणे विक्री
कोरोनाला आळा घालण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी काही व्यवसायांना परवानगीही नाकारण्यात आली आहे. यात पानटपरीचाही समावेश आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागातही खर्रा विक्री जोमात सुरू आहे. घरातून खर्रा बनवून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे खर्रा व गुटखा विकत घेऊन खाण्यामुळे इतरत्र थुंकण्याचे प्रकारही सुरूच आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.