वणी येथे शिक्षणाच्या वारीचे आयोजन
देवेंद्र खरवडे,वणी:- शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने शिक्षण विभाग पंचायत समिती वणी यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या एक दिवसीय शैक्षणिक मेळाव्याचे दि.4 एप्रिलला एस. बी. लॉन मध्ये आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात तालुक्यातील उपक्रमशिल शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे 25स्टॉल्स लावले होते नगर परिषद वणी अंतर्गत शाळांमधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळा क्र 7 ने सहभाग नोंदविला. या मेळाव्याचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती लिशाताई विधाते या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती संजय पिंपळशेंडे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा परिषद सदस्यां मंगलाताई पावडे, शीलाताई कोडापे, गटविकास अधिकारी राजेश गायनर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात नुसाबाई चोपणे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी केले. त्यानंतर तंत्रस्नेही शिक्षक दाम्पत्य प्रमोद ढेगळे व अश्विनी गोहोकार यांनी तयार केलेल्या स्मार्ट शिक्षक यु-ट्यूब चॅनलचे आ. बोदकुरवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
उदघाटनपर भाषण करताना आ. बोदकुरवार म्हणाले की, जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेत ज्ञानरचनावादी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता कृतिशील शिक्षणातून दिल्या जात असल्याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्यासह वणी पंचायत समितीच्या शिक्षकांचे कौतुक केले. त्यानंतर जिल्हापरिषद शाळा लालगुडा येथील विद्यार्थ्यांनी जलसाक्षरते वर उत्कृष्ठ नाटिका सादर केली.
या प्रसंगी मंगलाताई पावडे, डॉ. सुचिता पाटेकर, संजय पिंपळशेंडे, राजेश गायनर यांनी विचार व्यक्त केले . अध्यक्षीय भाषण करताना लिशाताई नी सर्व उपक्रमशिल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून प्रत्येक विद्यार्थी 100 टक्के प्रगत होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन निशा चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद नासरे यांनी केले.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…