मुलगा व सुनेची वृद्धास मारहाण, वृद्ध गंभीर जखमी

शेती विकण्यास विरोध केल्याने दोघांचा हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीच्या वादातून मुलगा व सुनेने वृद्धास मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला. वणी तालुक्यातील बोरगाव (खांदला) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विठ्ठल यादव देरकर (76) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी मारहाण करणारा मुलगा व सुनेविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, विठ्ठल यादव देरकर (76) हे बोरगाव (खांदला) येथील रहिवासी आहे. त्यांनी आपली 7 एकर शेती आपल्या दोन मुलांना, प्रकाश देरकर (वय 53) आणि अनिल देरकर (वय 50) यांना बक्षिसपत्र करून दिली आहे. अनिल हा मुलाच्या लग्नासाठी शेती विकण्याबाबत बोलत असतो. मात्र शेती विकण्याला वडील विठ्ठल यांचा विरोध आहे.

शुक्रवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास अनिल दारु पिऊन घरी आला. त्याने घरी शेती विकण्या बाबत वडिलांजवळ विषय काढला. त्याला वडिलांनी विरोध केल्यामुळे अनिल चिडला. त्याने वडिलांना शिवीगाळ करून त्यांचे दोन्ही पाय ओढले. त्यानंतर अनिल व त्याची पत्नी यांनी विठ्ठल यांना मारहाण केली. दरम्यान दोघांपैकी एकाने विठ्ठल यांच्या हातावर ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ते जखमी झाले. दरम्यान झालेल्या आरडाओरड मुळे विठ्ठल यांची मोठी सून व शेजारी आले. त्यांनी ही मारहाण सोडवली.   

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर विठ्ठल हे पायी शिरपूर येथील दवाखान्यात गेले, तिथे त्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र जखमी असल्याने त्यांना वणी येथे ऍम्बुलन्सने आणण्यात आले. या प्रकरणी विठ्ठल यांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल विठ्ठल देरकर व त्याच्या पत्नी विरोधात बीएनएस कलम 118 (1), 3(5), 351 (2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.