आगामी झेडपी, नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली

सोमवारी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिका-यांची वसंत जिनिंग मध्ये बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेची रणधुमाळी सुरु होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस तयारीला लागली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. दु. 4 वाजता वसंत जिनिंग येथे ही बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या मार्गदर्शनात ही बैठक होत आहे. परिसरात पहिल्यांदाच काँग्रेस एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. यामुळे काँग्रेसला उभारी मिळाली असून पक्षातील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.   

बैठकीत निवडणूक रणनीतीबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामांचा आढावा, मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या योजना आखल्या जातील. काँग्रेसने गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागातील जनतेसोबत नियमित संवाद साधला असून, त्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बैठकीत विविध उपक्रमांना गती देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवांवर भर देण्याच्या सूचना यावेळी चर्चिल्या जाऊ शकतात.

कार्यकर्त्यांनो, कामाला लागा! – खासदार प्रतिभा धानोरकर
जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणे हेच काँग्रेसचे खरे ध्येय आहे. आज परिसरात काँग्रेस एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला आहे आणि हीच ऊर्जा आगामी निवडणुकीतही दिसून येईल. स्थानिक विकासाबाबत सत्ताधारी अपयशी ठरले आहे. महागाई, शेतीची समस्या आणि वाढत्या बेरोजगारीमुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जनता काँग्रेसच्या पाठिशी आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करून, गावागावात पोहोचून आणि लोकांशी सातत्याने संवाद साधून आम्ही ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या पूर्ण ताकदीने हा लढा जोमाने लढायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, आताच कामाला लागा . – खा. प्रतिभा धानोरकर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बैठकीचा मुख्य उद्देश पक्ष संघटना बळकट करणे, काँग्रेसच्या विचारधारा आणि कामगिरीचा गावागावात प्रचार करणे, तसेच आगामी निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखणे हा आहे. बैठकीत वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीचे संयोजक आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, ही बैठक पक्षाच्या एकजुटीसाठी आणि आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोलाची ठरणार आहे.

Comments are closed.