रणधुमाळी: निवडणूक जाहीर, पण तिकीटची उत्सुकता कायम
मविआची जागा काँग्रेस की सेनेला? भाजपमध्ये कुणाला मिळणार तिकीट?
बहुगुणी डेस्क, वणी: निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या वणी विधानसभेची जागा काँग्रेस की सेनेला तर भाजपमध्ये तिकीट कुणाला मिळणार? याचीच चर्चा मतदारसंघात रंगत आहे. त्यातच आचारसंहीता लागण्याच्या दिवशी काँग्रेसने संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात भव्य धरणे आंदोलन करीत त्यांचा दावा अद्यापही स्टाँग असल्याचे दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये पक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर पक्ष विश्वास टाकणार की भाकरी फिरवणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
मविआत तिकीट काँग्रेसला जाणार की सेनेला याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. वणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मध्यंतरी तिकीट सेनेला जात असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आचारसंहिता लागण्याच्या दिवशीच काँग्रेसने संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यासाठी भव्य धरणे आंदोलन केले. त्याला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसादामुळे काँग्रेस अद्यापही रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी
या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून गेल्या काही वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसमध्ये संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात विविध आंदोलनं, निवेदन तसेच शेकडो उपक्रम राबवण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील विजय व विरोधी पक्ष म्हणून केलेली कामगिरी यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा दावा अद्यापही स्ट्राँग मानला जात आहे.
भाजपमध्ये देखील रस्सीखेच
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला. मात्र हरियाणातील मिळालेल्या यशाने भाजपमध्ये पुन्हा नवचैतन्य आले आहे. हरियाणात भाजपने अधिकाधिक नवीन उमेदवार देण्याचा फॉर्म्युला वापरला होता. त्यात त्यांना आधीपेक्षाही चांगले यश मिळाले. हाच फॉर्म्युला ते महाराष्ट्रात देखील वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे 50 आमदारांचे तिकीट यावेळी कापले जाणार, असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
तिकीट कापण्यामध्ये सलग तीन टर्म निवडून आलेले व निष्क्रीय आमदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अद्याप दोन टर्मच झाल्या आहेत. मतदारसंघात त्यांची लोकप्रियता आहे. मात्र त्यांना युवा असलेल्या तारेंद्र बोर्डे यांनी जबरदस्त आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या कुणबी पॅटर्नमुळे विदर्भात भाजपचा पराभव होत असल्याचे समोर आल्याने तारेंद्र बोर्डे यांचा दावा देखील भाजपमध्ये तेवढाच स्टाँग मानला जात आहे. तर दोन्ही उमेदवारांवर एकमत न झाल्यास आरएसएसकडून विजय चोरडिया यांचे नाव देखील अचानक पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मविआत कुणाला किती जागा द्यायचा या फॉर्म्युला ठरला आहे. पण विदर्भात काही मतदारसंघात काँग्रेस की सेना असा पेच निर्माण झाला आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे आणखी 10 ते 12 दिवस उमेदवारी जाहीर होण्यास लागू शकते. त्यामुळे सर्व उमेदवार वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.