शेतातील डीपीचा फेज बदलवताना शेतक-याला विजेचा जबर धक्का
मारेगाव तालुक्यातील मजरा (चोपण) येथील घटना, प्रकृती गंभीर
भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये असलेल्या डीपीवर फेज टाकत असताना विजेचा जोरदार धक्का लागून शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मजरा (चोपण) येथे संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. सुभाष रामचंद्र पिंगे (45) असे विजेचा शॉक लागून जळालेल्या इसमाचे नाव आहे.
सुभाषचे चोपण शिवारात शेत आहे. त्यांची ओलिताची शेती आहे. दोन दिवसांआधी त्यांच्या शेतातील डीपीचा फेज गेला होता. शनिवारी दोन दिवस पाणी न मिळाल्याने पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून सुभाष हे स्वतःच डीपीचा फेज टाकण्यासाठी शेतात गेले होते. फेज लावतानाच अचानक वीज पुरवठा सुरू झाला. सुभाषला विजेचा शॉक लागला व ते जमिनीवर फेकले गेले.
या अपघातात ते मोठया प्रमाणात जळाले. त्यांना शॉक बसल्याची माहिती परिसरातील शेतक-यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सुभाष बेशुद्ध अवस्थेत दिसले. घटनास्थळावरील शेतकऱ्यांनी त्यांना तात्काळ वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले.
विजमंडळाच्या गलथान कारभाराचा बळी
वीजमंडळाच्या गलथान कारभाराचे अनेक किस्से नेहमीच बघायला मिळतात. दिवसा वीज बंद तर रात्री शेतातील वीज सुरू असे चित्र सध्या आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याचे काम करीत असतात. शेतकऱ्यांना कधी साप चावणे, तर कधी विजेच्या धक्याने जीव गमावणे किंवा कायमचे अपंगत्व येणे अशा प्रकारच्या घटना आता नित्याच्याच झालेल्या आहेत. वीज मंडळाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहेत.
हे देखील वाचा:
वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई
Comments are closed.