शेतीच्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याचा डल्ला

आंबेझरी येथे दिवसाधवळ्या शेतक-याच्या घरी चोरी

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतात राब राब राबून आलेल्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याने डल्ला मारला. विशेष म्हणजे शेतकरी व त्याचे कुटुंब शेतात कामासाठी गेला असताना दिवसाधवळ्या चोरट्याने ही घरफोडी केली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा आंबेझरी ता. झरी येथे ही घटना घडली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा एकूण 67 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत झरी-मारेगाव तालुक्याच्या सीमेवर आंबेझरी हे गाव आहे. येथील शेतकरी शामराव भीमा ढोबरे हे दि 2 फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून कुटुंबियासह शेतात गेले होते. संध्याकाळी शेतातून परत आल्यावर त्यांना घराच्या दरवाज्याचा साखळी-कोंडा निघाल्याचे आढळून आले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांनी शुक्रवारी त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी पैसे ठेवलेला डबा उघडला. मात्र त्यात त्यांना पैसे आढळून आले नाही.

कापूस विक्रीतून आलेले 45 हजार रुपये त्यांनी डब्यात ठेवले होते. या रकमेसह चोरट्यांनी 1 ग्रॅम सोन्याचे मंगसूत्र व 2 डोरले किंमत 15000 रु. चांदीच्या पाटल्या किंमत 7000 असा एकूण 67000 रुपयांचा मुद्देमालावर डल्ला मारला. वर्षभराची कमाई चोरट्याने उडवल्याने शेतकरी प्रचंड तणावात आला आहे. त्यांनी या बाबत मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. ठाणेदार राजेश पुरी यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. या प्रकऱणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

परिसरात चोरीच्या घटनेत वाढ
सध्या शेतक-यांना शेतमालाचे पैसे मिळाले आहे. ही बाब चोरट्यांनी हेरली असून त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस शेतकरी शेतात गेल्यावर चोरटे डाव साधत आहे. अशा प्रकरणात आरोपीचा शोध न लागल्याने चोरट्यांची चांगलीच हिम्मत वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरच चोरट्यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

शेतातील डीपीचा फेज बदलवताना शेतक-याला विजेचा जबर धक्का

Comments are closed.