बांधकाम सुरु असणारे घर टारगेट, चोरायचे फिटिंगचा वायर

लाखोंचा इलेक्ट्रिक वायर चोरणारी टोळी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरातून सातत्याने ईलेक्ट्रीक वायर चोरीला जायचा. गेल्या 4 महिन्यात अशा 3 घटना समोर आल्या होत्या. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून या प्रकरणी गणेशपूर येथून 3 आरोपींना अटक करण्यात आली. कुलदीप राजेश मेश्राम (20), नीरज निळकंठ बोढाले (20) दोघेही रा. गणेशपूर व एक अल्पवयीन मुलगा अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

साहिल अनिल सलाट (२२) हे वणीतील इंदिरा चौक येथील रहिवासी आहे. त्यांचे स्वामी समर्थ नगर येथे नवीन घराचे बांधकाम सुरू होते. दिनांक 20 फेब्रुवारीला त्यांच्या नवीन घरात फिटिंग केलेले विद्युत वायर अज्ञात चोरट्यांनी कापून नेले. याची किंमत सुमारे 50 हजार होती. दुसरी तक्रार ही हरिशंकर मंगाराम पांडे (७६) रा. बाजोरिया लॉनजवळ यांची होती. त्यांचे रवी नगर येथे नवीन घराचे बांधकाम सुरु असताना 12 मार्चला अज्ञात चोरट्यांनी घरात जोडणी केलेले 40 हजार रुपये किमतीचे विद्युत वायर चोरून नेले होते.

तिसरी तक्रार ही कुंदन आनंदराव गौरकार यांची होती. त्यांच्या गुलमोहर पार्क येथील नवीन घरात जोडणी केलेला सुमारे 30 हजारांचा इलेक्ट्रीक वायर चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत 24 जूनला पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या वायर चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांचे डीबी पथक कामाला लागले. डीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. खब-यांना याची माहिती दिली.

असा लागला छडा…
माहितीच्या आधारावर गणेशपूर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर तेच भुरटे चोर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. ते दोघे व एक अल्पवयीन मुलगा असे तिघे जण नवीन घरात जोडणी केलेले वायर कापून व ओढून चोरी करायचे. नंतर ते वायर जाळून त्यातून निघालेला तांब्याचा तार ते भंगार दुकानात विकायचे. तशी त्यांनी पोलिसांना कबुलीही दिली आहे. पुढील तपास डीबी पथकाकडून केला जात आहे.

सदर कारवाई एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख बलराम झाडोकार, जमादार विकास धडसे, पोना पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसिम, गजानन कुडमेथे, श्याम राठोड यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.