विवेक तोटेवार,वणी; तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर पाऊस असल्याने वणी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बाजारपेठही थंड होती. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. या संपूर्ण वेळात विजेचा लपंडावही सुरूच होता. शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर वणी ग्रामीणमध्ये जवळपास पाच गावच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.
शहरातील मोमीनपुरा या ठिकाणचा विद्युत पुरवठा आज काही वेळापुरता खंडीत करण्यात आला होता. या ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने ही समस्या उद्भवली होती. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर तिथे पुरवठा पूर्ववत झाला. मंगलम पार्क जवळील रस्त्यावरील झाड कोसळल्याने चिखलगाव व गणेशपूर येथील विद्युत पुरवठा काही काळ बंद होता.
अद्याप किती गावातील वीज पुरवठा खंडीत आहे हे कळू शकले नाही. आज दिवसभर पाऊस सुरू असल्याने गावक-यांनी याबाबत तक्रार दिली नाही. त्यामुळे हे कळू शकले नाही. राजूर येथील शेतातील खांब कोसळल्याने राजूर, परसोनी, मुरधोनी, दहेगाव या ठिकाणची कृषी पंपाची वीज नसल्याची माहिती आहे. सदर वीज पुरवठा मंगळवारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अभियंता जाधव यांनी वणी बहुगुणीजवळ दिली आहे. सध्या वीज खंडीत असली तरी कोणत्याही ठिकाणी कोणती अप्रिय घटना घडली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.