पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण

ग्रामपंचायत सदस्या आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलं निवेदन

0
वणी: तालुक्यात आधीच पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावात बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. मात्र ज्या बोअरवेलमधून गावाला पाणीपुरवठा होता. त्या बोअरवेलवर शेतमालकानं अतिक्रमण करून गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंबंधी उपविभागीय अधिका-यांना निवेदन देऊन या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वणी तालुक्यातील भांदेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या बोदाड इथं पाणी टंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. परिणामी या गावात आमदार निधीतून खर्च करून लगतच्या शेतात बोअरवेल खोदण्यात आली. त्यावरून गावाला पाणी पुरवठा करण्यात येत होता. ज्या शेतात शासकीय निधीतून बोअरवेल खोदण्यात आली. त्या शेतमालकानं सदर बोअरवेलवर त्याच्या व त्याच्या कुटूबाचा कोणताही अधिकार राहणार नसल्याच दानपत्र लिहून दिलं होतं.
सदर शेतमालकाने त्याची शेती भाड्याने वहिवाट करण्यासाठी दिली. सदर वहिवाट करणा-या इसमानं गावाला पाणी पुरवठा करणा-या शासकीय बोअरवेलवर ताबा करून सदर बोअरवेलमधील पाणी ओलीतासाठी वापरणे सुरू केले आहे. परिणामी बोदाड येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा संबंधी निवेदन दिलं आहे.
यासंबंधी ग्रामस्थांनी आमदाराकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणीही लक्ष न दिल्यानं अखेर ग्रामपंचायत सदस्या भारती प्रवीण जांभुळकर यांनी पुढाकार घेत संबधीत शेतक-यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत, गावाला पाणी नियमीत पुरवठा सुरू करण्यासंबधीचे निवेदन दिले आहे. यावेळी प्रहार संघटनेचे सिद्दीक रंगजेज, गजानन झाडे, विठ्ठल कुत्तरमारे, बंडू पदलमवार, अमोल जांभूळकर, रामसजन कुत्तरमारे, बाबाराव उइके, सुरज उइके, विजू पंधरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.