शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान

या योद्ध्यामुळे वाचले मंदर गाव, मंदिरात घोडे अर्पण करण्याची प्रथा

0
निकेश जिलठे, वणी: निलगीरी बन म्हणजे वणीकरांचं डब्बापार्टी, पिकनिकचं एक लाडकं ठिकाण. पण कधीकाळी याच भूमीवर घनघोर लढाई झाली होती. रक्ताचे पाट वाहले गेले. गावं उजाड झाले. लढाईत जरी पराभव झाला असला तरी इतिहासात मंदरच्या लढाईची नोंद झाली. आणि त्या लढाईचे हिरो होते फकरूजीवीर… (शिवणी धोबेची लढाईही प्रसिद्ध आहे.)
चारगावकडे जाताना मंदरजवळच केसुर्ली फाट्याजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला फकरूवीर देवस्थान असा छोटासा बोर्ड दिसतो. तिथून अगदी 50 ते 100 मीटर अंतरावर हे देवस्थान आहे. हे देवस्थान खास करून मंदरवासीयांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. या देवस्थानात घोडे अर्पण करण्याची प्रथा आहे. हा संपूर्ण इतिहासच खूपच रंजक आहे. यात प्रेम, बदला, मारधाड, शौर्य सर्व आहे. ही कहाणी जाणून घेण्याच्या आधी या परिसराचा मॅप समजावून घेऊ.
वणीपासून चारगाव-कोरपना मार्गावर सुमारे 7 किलोमीटर अंतरावर निलगीरी बन आहे. त्यानंतर एक किलोमीटर अंतरावर मंदर हे गाव आहे. त्यापुढेच आधी धंदर हे गाव होते. व त्या शेजारी वडगाव हे गाव होते. इथं असलेल्या वडाच्या झाडामुळे त्याला वडगाव हे नाव पडले. मंदर हे गाव पोलिसांचं गाव म्हणून ओळखलं जायचं. या गावातून अनेक लोक पोलीस झाले आहेत.
Ankush mobile
मंदर हा परिसर गोंड राजाच्या अधिपत्याखाली होता. असं म्हणतात की गोंड राजाने आपली राजधानी शिरपूर येथे हलवली होती. इथला राज्यकारभार आगबा, सागबा, बागबा हे तीन भाऊ सांभाळायचे. यातील राजपूत्र बागबा हे अतिशय धाडसी, कर्तबगार म्हणून मुलखात प्रसिद्घ होते. त्यांचे अहेरी इथे राहत असलेल्या मामाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र त्यांच्या लग्नाला विरोध असल्याने त्याने मामाच्या मुलीला पळवून आणले व मंदिरात लग्न केले. पुढे याचा बदला घेण्यासाठी त्याचे मामा मोठी सेना घेऊन शिरपूरला आली. तेव्हा ते जोडपं राजवाड्यात होतं. मुलीच्या वडिलांना राजवाड्याच्या सर्व दरवाज्यासमोर कडबा टाकून राजवाडा पेटवून दिला. त्यातच राजपूत्र बागबा आणि त्यांच्या नवविवाहित राणीचा मृत्यू झाला.
One Day Ad
या शिरपूर मुलुखातच गोंड राजाच्या सैन्या मुलुखात मंदर येथे फकरू वानखेडे हा शूर सैनिक होता. त्याच्या शौर्याने तो मुलुखात ओळखला जायचा. इंग्रज भारतात आल्यावर गोंडराजा आणि इंग्रजांमध्ये नेहमी वाद सुरू असायचे. पुढे इंग्रजांनी गोंड राजावर चढाई करण्याचे तयारी केली. गोंड राजा आणि नागपूरचे राजे रघोजीराव भोसले यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गोंडराजावर ब्रिटीश आक्रमन करणार याची चाहूल लागताच गोंडराजांनी रघोजीरावांना मदत मागितले. रघोजीरावांनी सैन्याची मदत पाठवली. गोंडराजाच्या सैन्याचं नेतृत्व फकरू वानखेडे करत होता. अखेर इंग्रज आणि गोंड राजे व भोसलेंच्या सैन्याचं मंदर धंदर परिसरात घनघोर लढाई झाली.
धंदर म्हणजे निलगिरी बनच्या बाजूला व मंदरच्या पुढे. या लढाईत फकरू वानखेडेने अतुलनिल पराक्रम गाजवला. मात्र अखेर इंग्रजांच्या सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही व यात गोंडराजांच्या सैन्याचा पराभव झाला. केसुर्ली फाट्याजवळ सैनिकाशी लढताना फकरूला वीरमरण आहे. ही लढाई इतकी घनघोर होती की यात धंदर, वडगाव हे गाव संपूर्ण उद्ध्वस्थ झाले, उजाड झाले. इथले काही लोक मंदरला तर काही इतरत्र राहायला गेले.
असं म्हणतात की फकरू यांच्यामुळे मंदर हे गाव वाचले. त्यामुळे परिसरातील लोकांनी फकरू यांना वीर ही उपाधी दिली व फकरूचे फकरूवीर झाले. ज्या ठिकाणी त्यांना वीरमरण आले त्याच ठिकाणी लोकांनी एक छोटेसे स्मारक बांधले. त्या ठिकाणी मंदरवासी श्रद्धेने जातात व तिथे घोडे अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात.
पुढे बल्लारशाह येथील एका कुंभाराने इथे नवस बोलला. त्यांनीच इथे स्मारकाला मंदिराचे स्वरूप दिले. सोबतच तिथे मातीचा घोडा अर्पण केला. तेव्हापासून इथे घोडा अर्पण करण्याची प्रथा पडली. फकरूवीर या वीर योद्ध्याचे दैवतीकरण झाले. लोकांची श्रद्धा वाढत गेली. आज लोक नवस बोलायला येतात. पूजा करायला येतात. फकरूजीवीर यांना मंदरचं दैवत बोललं जातं. तिथे असलेले घोडे फकरूवीर यांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देतात. हा वारसा पुढेही सुरू आहे. त्यांचे वंशज नानाजी वानखेडे हे देखील आर्मीत होते.
पुढे कधी निलगीरी बनात गेल्यास त्या परिसरात लढल्या गेलेल्या रक्तरंजीत लढाईचा इतिहास तुम्हाला नक्की आठवेल.
(जिज्ञासुंनी काही नवीन माहिती असल्यास कमेन्टमध्ये टाकावी)
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!