सेवानिवृत्त पोलीस पाटील शिरभाते यांना निरोप

मित्र परिवारातर्फे निरोप समारंभांचे आयोजन

0

जब्बार चीनी, वणी: वणी शहराचे पोलीस पाटील म्हणून गेल्या 24 वर्षांपासून अविरत सेवा देणारे नितीन शिरभाते पाटील हे दि . 31 मेला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या मित्र परीवारातर्फे एका छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन शिरभाते यांना मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

समाजवादी पार्टीचे कोषाध्यक्ष रज्जाक पठाण, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष रवी बेलुरकर, रंगनाथ बँकेचे माजी संचालक सुभाष तिवारी, फारूक रंगरेज, विवेक तोटेवार प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

रज्जाक पठाण यांनी या समारंभाचे प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की शहराचा कणा समजल्या जाणा-या या पदाची गरीमा नितीन शिरभाते यांनी अतिशय निष्ठेने सांभाळली. नागरिक व पोलीस प्रशासनातील महत्त्वपूर्ण दुवा असणारे हे पद सांभाळताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. काही क्लिष्ट घटनांचा छडा लावताना पोलिसांच्या खांदयाला खांदा लावून त्यांनी आपले कर्तव्य बजावले.

या वेळी दीपक कोकास म्हणाले की शिरभाते यांचेकडे 24 वषापूर्वी त्यांचेकडे पोलीस पाटील पदाची जबाबदारी आली. तेव्हा पासून येथे येणा-या सर्वच अधिका-यांचा नितीन पाटील यांच्या कार्यप्रणालीवर कमालीचा विश्वास होता. अनेक महत्त्वपूर्ण तपासाच्या वेळी गुन्हेगारांचा माग काढताना पाटील यांनी वापरलेल्या सोर्सेसचा आधार महत्वपूर्ण ठरला.

तर रवि बेलुरकर नितीन शिरभाते यांच्याबाबत आठवण ताजी केली. ते म्हणाले की तालुक्यातील कुंभारखानी येथून एका चिमुकल्याचे अपहरण झाले होते. आरोपींचा ठावठिकाणा शोधताना बालकाला कोणतीही ईजा होवू नये या करीता पोलीस पाटील यांनी अवलंबलेल्या रणनिती नुसार कारवाई करुन बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली होती. यावेळी आखण्यात आलेल्या व्यहरचनेत नितीन पाटलांचा सिंहाचा वाटा होता.

तर सुभाष तिवारी यांनी कोरोनामुळे निरोप समारंभ छोटेखानीच करावा लागला याची खंत व्यक्त केली. तर शहरात सर्वसमावेशक व सौहार्दपूर्ण वातावरण राहण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे असे मत विवेक तोटेवार यांनी व्यक्त केले.

यावेळी निवृत्त पोलिस पाटील नितीन शिरभाते यांना मानपत्र, शाल, स्मृतिचिन्हे देऊन गौरव करून त्याच्या आजपर्यंतच्या अमोल सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच संचालन फारूक रंगरेज यांनी तर आभार जावेद पठान यांनी मांडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.