व्हिडीओ कॉल करून चोपण येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गोवर्धन पूजेच्या पर्वावर संपविले जीवन... विष घेतल्यानंतर त्याने शेतातून घरी व्हिडीओ कॉल केला. पत्नीला मला मुलांशी बोलायचे आहे.

भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी व जीवनाला कंटाळलेल्या एका तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. सदर घटना गोवर्धन पूजनाच्या पर्वावर दि. 25 ऑक्टोबरला सायंकाळच्या वेळेस तालुक्यातील कानडा शेतशिवारात घडली. मृत शेतकऱ्याचे नाव सचिन विठ्ठल ढोरे (36) असे आहे. मृत्यूआधी त्याने व्हिडीओ कॉल केला होता.

सचिन हा तालुक्यातील चोपण येथील रहिवासी होता. त्याच्या नावावर 3 एकर शेती आहे. तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गोवर्धन पूजनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सचिन दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याच्या शेताकडे गेला. शेतात गेल्यानंतर काही वेळाने त्याने फवारणीसाठी आणलेले मोनोसील नामक कीटकनाशक प्राशन केले व तो कानडा जंगलाजवळ असलेल्या शेताकडे गेला.

संध्याकाळ झाली तरी सचिन घरी न आल्याने त्याच्या घरचे, शेजारी तसेच मित्रमंडळींनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र तो आढळून आला नाही. शेवटी मित्रानी मोबाईल लोकेशनचा आधार घेत त्याला शोधले असता तो कानडा जंगलामध्ये मृतावस्थेत पडलेला आढळला.

तो कॉल ठरला शेवटचा…
सचिनने विष घेतल्यानंतर त्याने शेतातून घरी व्हिडीओ कॉल केला. पत्नीला मला मुलांशी बोलायचे आहे. मला त्यांचा चेहरा पाहू दे. त्यांचेशी शेवटचे बोलू दे असे त्याने नैराश्यात म्हटले. सचिनचे हे बोलणे ऐकून त्याची पत्नी घाबरली. पण कदाचित तो थट्टा मस्करी करीत असेल असे समजून तिने मोबाईल मुलांकडे दिला. तोच कॉल शेवटचा ठरला.

सचिन हा काही दिवसापासून चिंतेत होता अशी माहिती कुटुंबियांनी दिली. सचिनच्या नावावर 3 एकर शेती आहे. यावर्षी पडलेला ओला दुष्काळ आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी यामुळे सचिन आणि कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटलेले होते. अशातच आलेल्या नैराश्यातून सचिनने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. सचिनच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. ऐन दिवाळीत सचिनने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.