शेतक-याचे कुटुंब व जनावरासह उपोषण

घरी जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील निळापूर येथील एका शेतकऱ्याच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर एका इसमाने अतिक्रमण केले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचा घरी जाण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे सदर शेतकरी हा 7 मार्चपासून आपली पत्नी, मुलगा व जनावरांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. जनावरांनाही उपोषणास बसवल्यामुळे परिसरात हे आंदोलन चर्चेचा विषय झाला आहे.

वासुदेव रामजी ठाकरे (70) हे निळापूर येथील रहिवाशी आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून यांच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर शंकर बालाजी ठाकरे यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे वासुदेव याना आपली जनावरे, शेतीचा माल नेण्यास अडचण येत आहे. जनावरांनाही घराच्या आवाराच्या बाहेरच बांधावे लागत आहे. असा आरोप वासुदेव ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत अनेकदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणतीही कारवाई करण्यास तहसीलदारांनी असमर्थता दर्शविली. शंकर हे सरपंच व सचिव यांच्या जवळचे असल्याने ते याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप वासुदेव यांनी आपल्या निवेदनात केला आहे. जोपर्यंत सदर अतिक्रमन काढण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती वासुदेव यांनी दिली.

याबाबतचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार सरपंच, सचिव (निळापूर) याना दिले आहे. सदर शेतकरी हा आपले कुटुंब, पत्नी, मुलगा व बैल यांना घेऊन उपोषण करीत असल्याने सर्वांचे लक्ष यांनी वेधून घेतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.