अखेर विष प्राशन केलेल्या शेतक-याची मृत्यूशी झुंज संपली

शेतातच केले होते विष प्राशन, वणीतील रुग्णालयात सुरु होता उपचार

बहुगुणी डेस्क, वणी: विष प्राशन केलेल्या एका शेतक-याची मृत्यूशी झुंज संपली. इजासन (गोडगाव) येथील शेतकरी बाबाराव जनार्धन गौरकार यांनी गेल्या आठवड्यात शेतात विष प्राशन केले होते. त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत शेतकरी बाबाराव जनार्धन गौरकार (58) हे तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथील रहिवासी होते. त्यांची इजासन शिवारात शेती आहे. गुरुवारी दिनांक 3 एप्रिलला ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. मात्र घरी परतण्याच्या वेळी त्यांनी शेतातच विषारी द्रव्य प्राशन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परतणा-या काही शेतक-यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी याची माहिती बाबाराव यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांना तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांचा वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता.

अखेर 7 व्या दिवशी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. बुधवारी दिनांक 9 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. बाबाराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. बाबाराव यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

 

Comments are closed.