यवतमाळ: एका वृद्ध शेतकऱ्यानं स्वत: ची चिता रचून आत्महत्या केल्याची घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील ही घटना आहे. इथल्या वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
माधव शंकर रावते (वय 71) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. माधव रावते यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे ते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चिंतेत भरच पडली होती.
शनिवारी ते शेतात गेले होते कापूस वेचून पऱ्हाटीचे ढीग शेतात लावून ठेवले होते. शनिवारी त्याच पऱ्हाटीची चिता पेटवून त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिले. त्यांच्या शेतातून पऱ्हाटीचा ढीग पेटत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी त्यांचा मुलगा गंगाधर याला त्याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच गंगाधर व गावकरी शेतात धावत गेले. तोपर्यंत पऱ्हाटीच्या ढिगासह माधव रावते हेही त्यात संपूर्णपणे जळल्याचे आढळून आले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आतमहत्येचे सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण शांत होते ना होते तो हे प्रकरण उघडकीस आले आहे. पाठोपाठ हे प्रकरण उघडकीस आल्याने शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.