अतिवृष्टीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट

मारेगाव येथे उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 5 वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी, कोरडा तसेच ओला दुष्काळाबरोबर येत असलेले अस्मानी संकट, या सर्वांना कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आपले आयुष्य संपविले. तालुक्यातील चोपण येथे ही घटना घडली. सुरेश उर्फ गजानन भदुजी खिरटकर वय अंदाजे 50 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गजानन खिरटकर यांच्याकडे 9 एकर शेती आहे. यावर्षी संततधार पाऊस सुरु असल्याने पिकाची अवस्था बिकट झाली. संततधार पावसाने शेतातील पिकाची दयनीय अवस्था पाहून गजानन यांचे मन हेलवायचे. यातच गजानन यांनी सोमवारी दि 25 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता आपल्या राहत्या घरी एजिल नावाचे कीटकनाशक प्राशन केले.

घरच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. सातत्याने होणा-या आत्महत्येमुळे मारेगाव तालुका कुप्रसिद्ध झाला आहे. मात्र शासन स्तरावर याकडे कोणतेही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे.

Comments are closed.