पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट

संपूर्ण गाव 4 दिवस होते पूरग्रस्तांच्या सेवेत, परिसरात होतेये सावर्लावासीयांचे कौतुक

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी झोला व कोना या गावात पूर आला. हे दोन्ही गाव पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावातील सुमारे 900 लोकांना व जवळपास 250 जनावरांना सावर्ला येथे हलविण्यात आले होते. या संपूर्ण चार दिवसांच्या काळात सावर्ला वासीयांनी दिवस रात्र एक करत केवळ पूरग्रस्त नागरिकांचीच नाही तर जनावरांची देखील सेवा करत माणुसकीचे नाते घट्ट केले. त्यांच्या या कार्यात अनेक सामाजिक संघटनांनी साथ दिली. रात्री मदतीसाठी धावून गेलेल्या सावर्ला वासीयांचे परिसरात कौतुक होत आहे. तर कोना व झोला वासीयांनीही सावर्ला वासीयांचे आभार मानले.  

18 जुलै रोजी झोला येथे पूर परिस्थिती असल्याची माहिती सावर्ला येथील गावकऱ्यांनी मिळाली. रात्रीच संपूर्ण गाव आपापली वाहने ट्रॅक्टर, मालवाहू वाहन, दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन झोल्याच्या दिशेने मदतीसाठी निघाले. येथे प्रामुख्याने युववर्गाने पुढाकार घेतला होता. पूरग्रस्तांना मिळेत त्या वाहनाने सावर्ला वासीयांनी आपल्या गावात आणले. सोबतच जनावरांकडे दुर्लक्ष न करता त्यांनाही गावात आणण्यात आले. 

झोला येथील गावकऱ्यांची रात्री 11 वाजताच्या सुमारास सावर्ला गावातील जि.प. शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी जवळच असलेल्या कोना या गावात पूर आल्याची माहिती गावक-यांना मिळाली. येथेही बिकट परिस्थिती होती. त्या ठिकाणी ऑटोने गावकऱ्यांना सावर्ला येथे हलविण्यात आले.

जि.प. शाळेत इतक्या लोकांची राहण्याची व्यवस्था होणार नाही हे लक्षात घेऊन उपसरपंच अविनाश सोमलकर व सचिव शेंडे यांनी भालचंद्र चोपणे यांना पूरग्रस्तांना महाविद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्याबाबत विचारणा केली. चोपणे यांनी विनाअट आपले बालाजी पॉलिटेक्निक कॉलेज पूरग्रस्तांसाठी तातडीने उघडून दिले. त्या दिवशी दोन्ही गावातील लोकांना या कॉलेजमध्ये हलविण्यात आले. थंडी असल्याने पूरग्रस्तांसाठी ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली.

महिलांच्या अडचणींसाठी गावातील महिला बचत गटाने पुढाकार घेतला. त्यांनी महिलांना आवश्यक ती मदत केली. पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सोबतच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न होता. जनावरांसाठी चाऱ्याची देखील व्यवस्था केली. या कामात त्यांना वणी येथील नेते मंडळी व सामाजिक संघटनांनी मदत केली. सावर्ला येथील युवक, महिला बचत गट, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका हे लोकांना सेवा देत होते. सोबतच सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, सचिव हे सर्व व्यवस्था बघत होते.

सावर्ला ग्रामवासीयांचे मानले पूरग्रस्तांनी आभार
सावर्ला गाव देखील पुराच्या तडाख्यात सापडणार होते. गावाच्या अवघ्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत नदीचे पाणी पोहोचले होते. मात्र त्याची पर्वा न करता सावर्ला वासी पूरग्रस्तांसाठी सेवा देत होते. पुराची माहिती मिळताच रात्रीच गावातील वाहने बाहेर काढून ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. सावर्लावासीयांनी केलेल्या मदतीबाबत झोला आणि कोना गावातील रहिवाशांनी आभार मानले. सोबतच संकटसमयी केव्हाही धावून येणार असल्याची ग्वाही यावेळी सावर्ला ग्रामवासीयांनी दिली.

Comments are closed.