सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या एक वर्षापासून विविध समस्यानी शेतकरी, तरुण व हमाल लोकांना त्रस्त करून सोडले आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या, यासाठी युवक काँग्रेसने उपोषण सुरू केले आहे. भाजप नगरसेवकाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
विविध समस्यांचे निवेदन तहसीलदारांना आठ दिवसांपूर्वी सादर करून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्या निवेदनात कृषी उत्पन्न बाजार समितीत ४० हमाल असून २०१७-१८ मध्ये नाफेडमार्फत खरेदीदरम्यान हमाल लोकांनी घाम गाळून हमाली केली. परंतु अजूनही ३ लाख ६७ हजार मिळाले नाही. त्यामुळे हमालसुद्धा अडचणीत सापडला आहे. तसेच २०१७-१८ मधील शेतकऱ्यांचे लाखो रुपये नाफेडमार्फत खरेदी केलेल्या चण्याचे पैसे मिळाले नाही. तर शेतकऱ्यांचा माल ऑनलाइन नोंदणी केल्यावर मार्केट यार्डात नेण्यात आला. .
परंतु त्या मालाची मोजणी झाली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना मेसेज आला नाही. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरले होते. परंतु अजूनपयंर्त असे ३०० ते ४०० शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. १३ नोव्हेंबरपासून तूर खरेदी सुरू झाली परंतु दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तूर विकलेल्या शेतकऱ्यांना विकलेल्या मालाची रक्कम मिळाली नाही.
खाजगी मार्केटचा दर कमी असून नाफेडमार्फत केंद्र त्वरित सुरू करावे. मुकुटबन येथे एम पी बिर्ला सिमेंट कंपनी सुरू झाली असून सदर कंपनीत बाहेर राज्यातील विविध रिक्त पदे स्थानिक तरुणांना वगळून भरल्या जात आहे. तालुक्यातील तरुण बेरोजगार युवक पात्र नाही का? असा सवाल करण्यात आला. आठ दिवसात प्रश्न निकाली न काढल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु आठ दिवस लोटूनही कारवाई न झाल्याने आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, सरपंच तथा बाजार समितीचे माजी संचालक निलेश येल्टीवार, पंचायत समिती उपसभापती नागोराव उरवते, राहुल धांडेकर, प्रभाकर मंदावार, राकेश गालेवार, नितीन खडसे सहभागी झाले आहे. उपोषणाला भाजप नगरसेवक सचिन पंधरे यांनी पाठींबा दिला आहे.