विवेक तोटेवार,वणी: घरासमोर कपडे वाळवण्याच्या शुल्लक वादातून दोन महिलांमध्ये झटापट झाली. यात एका महिलेने दुस-या महिलेला मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी महिलेचे बोट फ्रॅक्चर झाले. गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास तालुक्यातील पळसोनी येथे ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या महिलेवर विविध कलमानुसार वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला ही 40 वर्षांची आहे. तिच्या घराशेजारी आरोपी (35) महिला राहते. आरोपी महिलेने तिच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यालगत कपडे सुकवण्यासाठी दोरी बांधली आहे. मात्र कपडे सुकवण्यावरून दोघींमध्ये कायम वाद व्हायचा. फिर्यादीचे म्हणणे आहे की माझ्या घरासमोर कपडे का वाळू घालते. तर आरोपीचे म्हणणे आहे की ती रस्त्यालगत कपडे वाळू घालते. यावरून या दोन शेजा-यामध्ये नेहमी वाद व्हायचा. सातत्याने होणा-या वादामुळे 2 वर्षांपासून दोघी एकमेकांशी बोलत देखील नाही.
गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला ही आपल्या घरी साफसफाई करीत होती. तिने घरासमोरील झाडू मारण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या घरासमोर आरोपी महिलेने दोरीवर कपडे वाळू घातले होते. मी धुतलेले कपडे धुळ उडवून खराब करीत आहे असे म्हणत आरोपी महिला फिर्यादी महिलेशी वाद घालण्यास आली. वाद चांगलाच वाढत गेला. दोघांमध्ये चांगलीच जुंपली. आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला मारहाण करीत तिचे बोट मुरगळले. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत फिर्यादी महिलेचे कपडे देखील फाटले.
वाद संपल्यानंतर घरकाम करताना फिर्यादी महिलेचे बोट सातत्याने दुखत असल्याचे तिच्या लक्षात आले. ती वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली. तिथे एक्सरे काढला असता झटापटीत तिचे बोट फ्रॅक्चर झाल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी महिलेने वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात मारहाण करणा-या 35 वर्षीय महिलेवर बीएनएसच्या कलम 117 (2), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.