खाण धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
विवेक तोटेवार, वणी: शहरातील तीन विद्यार्थ्यांचा शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी वांजरी येथील खाणीमुळे तयार झालेल्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. खाण धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांचा बळी गेला, असा आरोप करत खाणपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच शासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शहर ए मदिना सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. या प्रकरणी संस्थेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शनिवार 2 सप्टेंबर रोजी आसिम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिक शेख (16) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर हे तिघेही मित्र वांजरी येथे फिरायला गेले. त्या ठिकाणी बंद असलेल्या खदाणीच्या पाण्यात पोहायला गेले. त्या ठिकाणी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.
मृतकाच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा खाणधारक कुणीही आले नाही. सदर खाण ही शासनाने उत्खणणासाठी भाडे तत्वावर दिली गेली आहे. पावसाळ्यात खाणीत पाणी साचत असल्याने पावसाळ्यात उत्खणणाचे काम बंद असते. सदर खाण ही पाणी भरल्याने बंद अवस्थेत आहे. मात्र या ठिकाणी खाण धारकाने तारांचे कुंपण केले नाही. शिवाय या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नाही. त्यामुळे तीन निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी मिर्झा जफर बेग, रज्जाक पठाण, सिद्धीक रंगरेज, जाफर अली, मोहंमद आफताब अब्दुल सत्तार, अब्दुल आसीम अब्दुल आलीम, मोबिन शेख, सोहेल अहेमद आझाद अहेमद, अब्दुल सत्तार अब्दुल मुनाफ, साहिल हुसैन शेख, इरशाद शेख जब्बार शेख इत्यादींची उपस्थिती होती.
Comments are closed.