सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कारवाईकरीता शेकडो तरुण धडकले पोलीस स्टेशनवर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गापूर येथील तरुणाने फेसबुक व वॉट्सऍपवरून आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी असाच एक प्रकार घडला होता. मात्र त्याने माफी मागितल्याने प्रकरण मिटले असताना आणखी असाच दुसरा प्रकार समोर आला. यावेळी तात्काळ कारवाई करावी यासाठी शेकडो तरुणांनी पोलीस स्टेशन गाठले होते.
2 जुलैला प्रशिक नामक एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्याच्याविरोधात कारवाई करावी यासाठी 60 ते 70 तरुण रात्री 8 वाजता पाटण पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता धडकले. मात्र यावेळी तरुणाने माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. अखेर तरुणाने ठाणेदार व तक्रारकर्त्यांना या पुढे अशी घटना घडणार नाही याची ग्वाही दिल्यानंतर हे प्रकरण तिथेच मिटले व प्रशिकला सोडून देण्यात आले.
दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी त्याच गावातील तरुण साजन विलास जिल्टे रा. दुर्गापूर फेसबुकवर आक्षेपार्ह धार्मिक मॅसेज व फोटो पोस्ट केला. सलग दुस-या दिवशीही असाच प्रकार झाल्याने परिसरातील खवळले त्यांनी लगेच पाटण पोलीस स्टेशन गाठले. बादल मोहुर्ले याने याबाबत लेखी तक्रार दिली.
सामाजिक व जातीय सलोखा बिघडू नये म्हणून पोलिसानी साजन जिल्टे विरोधात कलाम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी निखिल वनकर सह राहुल शेंडे, लक्ष्मीकांत मिलमिले, देवीचंद ठाकरे विपीन भोयर राजेश झोडे, बादल मोहूर्ले, निखिल भोंग व इतर अनेक तरुण उपस्थित होते.