वणीत कोरोना रुग्णांची संख्या 9, आणखी 2 नवीन रुग्ण निष्पन्न

कशी तयार झाली नवीन साखळी ?

0

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची साखळी खंडीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही नवीन साखळी असल्याने प्रशासनासह वणीकरांच्याही चिंतेत भर पडली आहे. काल संध्याकाळी 1 नवीन रुग्ण  व आज सकाळी आणखी 1 रुग्ण निष्पन्न झाला आहे. त्यामुळे आता वणीतील कोरोनाची संख्या ही 9 झाली आहे. कोरोनाचा नवीन रुग्ण मिळाल्याची माहिती मिळताच त्या व्यक्तींचे घर व व्यापारी प्रतिष्ठान सिल करण्याच्या प्रक्रियेला रात्रीच सुरूवात झाली.

नवीन साखळी कशी तयार झाली?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीची बहिण सध्या डिलेव्हरी निमित्त वणीत माहेरी आली आहे. दिनांक 22 जून रोजी पॉजिटिव्ह व्यक्तीच्या बहिणीला भेटण्यासाठी त्याचे भावजी मित्रांसह जळगावहून वणीत आले होते. चार दिवस घरी राहिल्यानंतर दिनांक 26 ला ते सर्व पाहुणे परत गेले. दोन दिवसांनी पॉजिटिव्ह व्यक्तीला ताप येऊन त्यांच्यात कोरोनाचे सौम्य लक्षण दिसून आले. खबरदारी म्हणून ते 28 जूनला वणीतील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घेण्यास गेले. डॉक्टरांनी जर दोन दिवसात ताप उतरला नाही तर कोरोनाबाबतची चाचणी करण्याचा सल्ला दिला.

दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीमध्येही ताप येऊन तिच्यामध्येही कोरोनाचे सौम्य लक्षणं दिसून आले. त्यामुळे दोघांनीही खबरदारी म्हणून दोन दिवसांआधी नागपूर गाठले. तिथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. काल रात्री पतीचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला तर आज रविवारी सकाळी पत्नी पॉजिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.

Madhav Medical

संसर्गाचा मुळ स्त्रोत कोणता?
कुटंबात ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीमध्ये केवळ पॉजिटिव्ह असलेल्या पति पत्नीमध्येच कोरोनाचे लक्षणं दिसून येत होते. इतरांमध्ये तसे काही लक्षणं नव्हती. 22 जूनला त्यांच्याकडे जे पाहूणे आलेत त्यांच्यातही अद्याप कोरोनाचे लक्षणं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या साखळीचा मुळ स्त्रोत काय हे अद्याप कळू शकले नाही.

रिकामे कोविड केअर सेन्टर पुन्हा भरले…
आणखी दोन रुग्ण पॉजिटिव्ह आल्याची माहिती वणीमध्ये वा-यासारखी पसरली. प्रशासकीय यंत्रणा रात्रीच कामाला लागली. सदर व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान सिल करण्यात आले आहे. सध्या 40 लोकांना कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले आहे, तर होम कॉरन्टाईन करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. सततच्या दिलासादायक, निगेटिव्ह रिपोर्टमुळे परसोड्यातील कोविड केअर सेन्टर रिकामे झाले झाले होते. मात्र आता कोरनाच्या रुग्णाची नवीन साखळी तयार झाल्याने रिकामे झालेले कोविड केअर सेन्टर रातोरात पुन्हा भरले.

कॉरन्टाईनच्या भीतीने अनेकांची धूम….
ज्या अपार्टमेन्टमध्ये सदर रुग्ण सापडले आहेत तिथे राहणा-या काही लोकांनी परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरन्टाईन होण्याच्या भीतीने रात्रीतूनच धूम ठोकल्याची माहिती मिळत आहे. सकाळी जेव्हा तिथे डॉक्टरांची टीम होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यासाठी तिथे गेली असता, तिथे त्यांना केवळ मोजकेच लोक आढळून आलेत. हा देखील एक धक्कादायक प्रकास असून याबाबत प्रशासनाने कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे.

रुग्ण मिळताच सतर्क, साखळी खंडीत होताच दुर्लक्ष
रुग्ण मिळताच वणीकर जनता सतर्क झाली. लोकांच्या चेह-यावर मास्क आले. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाऊ लागले. मात्र साखळी खंडीत होत असल्याची माहिती समोर येऊ लागताच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष सुरु झाले. दरम्यान मास्क न बांधणे, भेटीगाठी घेणे, छोटे गेट टुगेदर असा चांगलाच एन्जॉय वणीकरांनी केला. मात्र आता पुन्हा दोन नवीन रुग्ण सापडल्याने वणीकरांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. आता आणखी किती दिवस वणीकर कोरोनाबाबत खबरदारी घेतात व दुर्लक्ष करणा-यांवर प्रशासन काय कारवाई करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!