अखेर बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला सुरूवात

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: 15 वर्षांपासून गावकरी होते रस्त्याच्या प्रतीक्षेत

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याच्या कामासाठी गावकरी प्रतीक्षेत होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांना आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही. अखेर ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने याची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे.

बुरांडा-खापरी हा मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत येतो. खापरी येथे जाण्याकरिता सदर मार्ग हा एकमेव मार्ग आहे. दोन किलोमीटर असलेल्या या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र रस्ता नसल्याने खाचखडगे पार करत नागरिकांना प्रवास करावा लागायचा. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट व्हायची. नागरिकांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला असता त्यांना रस्ता मंजूर आहे एवढेच उत्तर मिळायचे. मात्र कामाला सुरूवात होत नव्हती.

‘वणी बहुगुणी’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा करत बातमी प्रकाशीत केली होती. याची दखल घेत आता रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. रस्त्याच्या कामाला लागणाऱ्या साहित्य ठेवण्याकरिता जागा तयार केली जात आहे. बांधकाम साहित्य जमा करण्याचे काम सुरू झाले असून लवकरच हा रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मे महिन्यात 2 किमी पैकी फक्त अर्ध्या अंतराचीच तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

‘वणी बहुगुणी’चे मानले आभार
गेल्या पंधरा वर्षापासून बुरांडा-खापरी रस्ता दुर्लक्षीत होता. पावसाळ्यात पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले होते. उखडलेल्या रस्त्यातून दुचाकी चालवण्यास त्रास व्हायचा. रस्ता खराब असल्याने गावात क्वचितच चार चाकी वाहन यायचे. एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास येथून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास कसरत करावी लागायची. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत खापरी वासियांनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

हे देखील वाचा:

थरार: 45 लाखांच्या दरोड्यातील आरोपीला राजस्थानमधून अटक

गोरज येथील विवाहित तरुण 4 महिन्यानंतरही बेपत्ताच

Comments are closed.