स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

रंगांची पेरणी करणारा हरहुन्नरी कलावंत उमेश रासेकर याची यशोगाथा

1

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध स्पर्धांमध्ये त्याला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं, यासाठी तो अनेक स्पर्धांना जात असतो. नुकत्याच झालेल्या सी.एम. चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर भन्नाटच आहे. तो स्पर्धक म्हणून गेला. तिथले अन्य स्पर्धक तो पाहू लागला. त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि अनुभवी स्पर्धक त्याला तिथे दिसलेत. तो घाबरला, तो स्पर्धेत उतरलाच नाही. तो जवळपास खचलाच होता. तरी त्याला ही संधीच वाटली.

तो त्या कलाकृतींची निर्मितीप्रक्रिया पाहायला लागला. हातांचे घुमाव, रांगोळी सोडण्याची लकब, रांगोळ्यांची धार हे सगळं काही तो मेंदूत फीट करू लागला. हा प्रयोग घरी आल्यावर प्रत्यक्षात करून पाहण्याचं त्याने ठरवलं. इंटरनेटवरून त्याने काही व्हिडिओ पाहिलेत. निरीक्षण आणि स्मरण यांतून त्याने रांगोळी काढायला सुरूवात केली. ती जमली. किंबहुना ती सुपरच झाली. इथपासूनच त्याच्या कलेने एक वेगळी झेप घेतली. त्याने संपूर्ण लाईफच बदललं.

यवतमाळ जिल्ह्यातील वणीतला हा बहुगुणी कलावंत युवक आहे, उमेश प्रफुल्ल रासेकर. वणीतले प्रफुल्ल आणि वृंदा रासेकर यांचा हा मुलगा. व्यावसायिक चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द आता हळूहळू बहरायला लागली. आजोबांच्या अमृतवाणीचं तो आता सोनं करीत आहे. त्याची ही कहाणी सगळ्यांनाच प्रेरणा देणारी ठरेल.

आई लेकरानं काढलेल्या चित्रांचं कौतुक करीत होती. लेकराच्या उत्साहाला भरती येत होती. तेवढ्यात बाजूला बसलेले आजोबा बोलले. त्यांच्या गंभीर आणि कातर आवाजात धार होती. आपल्या लेकीच्या आणि नातवाच्या कौतुकसोहळ्याला त्यांनी अचानक ब्रेक दिला. आजोबांनी जे म्हटलं, त्यामुळे नव्या नव्या चित्रकार उमेशचं आणि त्याच्या आईचंही मन खट्टू झालंण् आजोबांच्या अनुभवी वाणीतून जणू एक महामंत्रच निघाला. याच मंत्रानं उमेशच्या लाईफला टर्निंग पॉईट मिळाला.

सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय घरातच आहे. अगदी आजोळीसुद्धा. त्यातही लाकडांवर कोरीवकाम ही उमेशच्या कुटुंबाची खासियत. लाकडांशीच खेळता खेळता हातात अवजारंही आलीत. उमेशही लाकडावंर कोरीवकाम करायला शिकला. चिमुकल्या उमेशला रंगीत कांड्या, क्रेयॉन पेन्सिल्स, जास्त आकर्षिंत करायच्या. वणीतल्या विवेकानंद विद्यालयात तो शिकत होता. चित्रकला हा कंपल्सरी विषय होता. चित्रकलेची ओढ नात्यात बदलली. संतोष म्हसे त्याचे चित्रकला शिक्षक. त्यांनी त्याची ही रुची हेरली. त्यांनी जवळपास दोन ते तीन महिने उमेशला चित्रकलेतले बारकावे सांगितले.

हातात पेन्सील घेऊन तो स्केचेस काढण्याचा प्रयत्न करू लागला. थोडंफार त्याला जमायलाही लागलं. तो चित्रकलेत रमायला लागला. व्यावहारिक आजोंबाना या गोष्टींचं आतून कौतुक होतं. तरीदेखील त्यांनी एक दिवस अगदी कठोरच शब्दांत उमेशला म्हटलंच. ‘‘जी कला तुझं पोटं भरेल, तीच तुला जगवेल आणि समृद्ध करेल. आधी पक्क्या भाकरीची सोय कर. करीयर कर, मग तुला सगळं आकाश खुलं आहे.’’

आजोबांच म्हणणं उमेशलाही पटलं. घरात सुतारकामाचा व्यवसाय आहेच. आपण शिक्षण घ्यावं. छान सेटल व्हावं, असं उमेशनं ठरवलं. मग सन 2017 ला उमेशनं कम्प्युटर सायन्समध्ये बी.एससी. पूर्ण केलं. लगेच 2019 ला एम.एससी देखील यशस्वीरीत्या पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झालं नि तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला.

चित्रकलेची ओढ उमेशला स्वस्थ बसू देत नव्हती. आजोबांचा मूलमंत्र त्याच्या डोक्यात निनादतच होता. कलाही जोपासता आली पाहिजे. पोटापाण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे. त्यावर त्याला एक मस्त सोल्यूशन मिळालं. एम. एस.सी. झाल्याबरोबर 2019मध्येच त्याने यवतमाळला आर्ट टीचर डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आजही तो अनेक विद्यार्थ्यांच्या ट्यूशन्स घेतच असतो.

सर्व कलेत माहीर…
उमेशला स्केचिंग, पेंटिंग, वॉल पेंटिंग, वॉल डिझायनिंग, अॅक्रेलिक , ऑईल, सॉफ्ट पेस्टेल कलर्स, वॉल आर्ट सगळेच प्रकार जमतात. कुटुंबातलं लाकडी कोरीवकामही त्याला जमतं. त्यात आता रांगोळी हा नवा कलाप्रकार त्याने आत्मसात केला. एक रांगोळी तर त्याने घरातल्या अंगणातच काढली. त्याचा हात ‘साफ’ व्हायला लागला.

रांगोळीतच उमेशची हळूहळू ओळख व्हायला लागली. विविध चेहरे तो रांगोळीतून रेखाटायला लागला. विविध कार्यक्रमांतून त्याला रांगोळी काढण्याच्या ऑर्डर्स यायला लागल्यात. मानधन मिळायला लागलं. किंबहुना तो त्याचा आता व्यवसायच झाला. आजोबांचा कानमंत्र त्याच्या कामात आला. सोषल मीडियातून त्याचे व्हिडिओ व्हायरल होतो.

कोरोनाचा काळ सुरू आहे. लॉकडाऊनही सुरू आहे. अनेकांचे उद्योगधंदे बुडालेत. तरीही उमेशची स्टोरी सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे.

संपर्क: उमेश रासेकर – 7057676129, 9730920496

हे पण वाचा….

मातीचे सोने करणारे सोनकुसरे…

आयुष्याचे गाणे गाणारा निसर्ग”दत्त” गायक

 

Leave A Reply

Your email address will not be published.