मातीचे सोने करणारे सोनकुसरे…

हात लावताच मातीचे करतो सोने

0

 

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: मॉरिशसमध्ये त्यांच्या शिल्पांची चर्चा झाली. त्यांची अनेक शिल्पं दुबईत पोहचलीत. पुण्यातील टिळकांच्या वाड्यातील पुतळा, नागपूरच्या संविधान चौकातील बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रसंगांचे भित्तिशिल्प, गोवारी स्मारकांचे म्युरल्स तयार करणारे असे जे. जे. कॉलेज ऑफ आर्टसचे टॉपर विद्यार्थी राहिले. वैशालीनगर नागपूर आंबेडकर उद्यानातील कलाकृती, वणीतील सानेगुरूजींचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पोर्टेटसह भारतभर त्यांच्या अनेक कलाकृती आहेत.

गोवा सरकारने गोवा कला अकादमीत परीक्षक म्हणून 2017मध्ये त्यांना बोलाविलं होतं. आर्ट सोसायटीने मुंबई येथे 1200 पोस्टर्स व शिल्पांमधून निवडण्यासाठी त्यांना परीक्षक म्हणून निमंत्रित केलं होतं. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील पाच लोकांचा सत्कार संस्कृत विद्या कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांचा हस्ते झाला. या पाच पैकी एक नाव होतं. चित्रकार व शिल्पकारांच्या चरित्रकोषात यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव आर्टीस्ट म्हूणन त्यांच्यावर मोठा लेख आहे.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

लहानपणी ऐकलेली एका राजाची गोष्ट आठवली. त्याला वरदान मिळालेलं असतं. तो त्या वस्तूला हात लावील ती वस्तू सोन्याची व्हायची. वणीतही असाच एक वरदान लाभलेला व स्वबळावर झालेला कलेचा राजा आहे. असे वणीचे सुपुत्र अशोक नामदेवराव सोनकुसरे यांची कवी, गीतकार, निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत.

सुनील इंदुवामन ठाकरे: बालपणाबद्दल सांगा.
अशोक सोनकुसरे: मी शेतकरीपुत्र आहे. माझे वडील नामदेवराव हे शेतकरी होते. वणीजवळील मंदर येथे शेती करायचे. त्यांना रंगांचं चांगलंच ज्ञान होतं. ते नाट्यकलावंतदेखील होते. अनेक नाटकांचं ते नेपथ्य करायचे. गणेश विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून नाट्यप्रयोग करून तथा विविध माध्यमांतून देणगी गोळा करून वणी शहरातील पं. नेहरू व गुरूदेव रविंद्रनाथ टागोर ह्यांचे पुतळे उभारलेत. पेंडसे पेंटरसोबतही ते काम कराचे.

सुनील इंदुवामन ठाकरे: आपली चित्रकलेची सुरूवात थोडी मजेशीर आहे, त्याबद्दल सांगा.
अशोक सोनकुसरे: पाचवीत चित्रकलेच्या शिक्षकांनी वर्गात कडुनिंबाच्या पानाचं चित्र काढायला सांगितलं. मला काही केल्या ते जमेना. शेवटचा पर्याय म्हणून मी शाळेतून धूम ठोकली आणि पळून गेलो. मात्र आवड कायम होती. सहावीपासून मी त्यात अधिक इंटरेस्ट घ्यायला लागलो. मग मस्त भट्टी जमली. रंग माझे मित्र झालेत. आदर्श हायस्कूलच्या चांदवडकर, चिल्कावार, सिडाम या चित्रकलेच्या शिक्षकांनी माझा पाया मजबूत केला. पहिलं चित्रकलेचं बक्षीस मला लोकनायक बापूजी अणे यांच्या जलरंगातील चित्रासाठी वणी शहरातच मिळालं होतं. पुढे चालून त्यांचं यवतमाळातील अर्धाकृती पुतळादेखील मीच तयार केला ही बाब माझ्यासाठी नक्कीच सुखद होती.

सुनील इंदुवामन ठाकरे: मातीशी नातं कधी जुळलं?
अशोक सोनकुसरे: शाळेत जात असताना अनेक मूर्तिकारांची कामं बघत बघत जायचो. तेव्हा वणीत टेंभूरकर पेंटर, बंडू बुरडकर, पेंटर दिलिप पवार यांच्या कामांचं निरीक्षण करायचो. अनेकदा त्यांच्या स्टुडिओत जाऊन बसायचो. नदीवरून माती आणली. घरी मूर्ती करून पाहिली. मूर्तीला एक हात बसविला की दुसरा पडायचा. दुसरा लावला की पहिला पडायचा. मग पुढे जाणकारांनी मला टेक्निकल माहिती दिली. हळूहळू माझ्यातला मूर्तिकार विकसित होऊ लागला. फुलू लागला. मला अनेकजण हसायचे. माझी खिल्ली उडवायचे. मी मात्र टिकून राहिलो. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मला मुंबईत पहिलं बक्षिस मिळालं. याच सोसायटीने पुढे चालून मला परीक्षक म्हणूनदेखील बोलावलं.

सुनील इंदुवामन ठाकरे: चित्रकला महाविद्यालय नागपूर आणि जे. जे. आर्टस् कॉलेज मुंबईचा प्रवासही थरारकच होता?

अशोक सोनकुसरे: शिल्पकलेत करिअर करण्याची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे जमेल की नाही याची शंका होती. वडलांनी मंदर येथील शेती विकण्याची तयारी दाखविली. वणीला मी मूर्तिकाम करायचो. अनेकांना सहाय्यक म्हणून जायचो. त्यातून पैसे मिळविले होते. त्यातूनच नागपूरला चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुदैवाने वडलांना शेती विकण्याची वेळ आली नाही. जे. जे. म्हणजे कलावंतांचं स्वप्न असतं. तिथे प्रवेश मिळाला.

सुनील इंदुवामन ठाकरे: जे. जे. मधले अनुभव कसे राहिलेत?

अशोक सोनकुसरे: चार वर्षांमध्ये तिथे बरंच काही शिकायला मिळालं. मी कॉलेजमधील अनेक विभागांमध्ये जायचो. तेथील अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांसोबत चर्चा करायचो. माझ्या कलाकृती त्यांना दाखवायचो. त्यामुळे सगळं कॉलेजच मला ओळखायचं. माझ्या शिक्षकांना माझ्या क्षमतेची जाणीव होती. याच शिक्षकांमधून प्रा. एस. आर. पवार यांच्या मार्गदर्शनात व सोबत भोपाळ येथील इंदिरा गांधी यांच्या १२ फूट उंच पुतळ्याचे काम केले. चेहऱ्याचे डिटेलिंग पूर्ण माझ्या हातचे आहे. मी विद्यार्थीदशेत प्रचंड मेहनत घेतली. खूप खूप शिकण्याची धडपडं आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. याचेच फळ म्हणून 1994 ला मी जे. जे. मधून फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. मला तिथे फेलोशिप मिळाली. काही काळ मी तिथं शिकवलंदेखील आहे.

सुनील इंदुवामन ठाकरे: कोणकोणते कला प्रकार आपण हाताळता?
अशोक सोनकुसरे: मी भित्तीशिल्प (म्युरल्स), पुतळे, पोर्टेट, शिल्प, डायोरामा अशा विविध प्रकारांत काम करतो. जशी डिमांड असते त्यानुसार कामे करावी लागतात.

सुनील इंदुवामन ठाकरे: म्युरल्सबद्दल थोडं सविस्तर सांगा.
अशोक सोनकुसरे: भित्तिशिल्पांना इंग्रजीत म्युरल्स म्हणतात. यात लो रिलीफ किंवा बास रिलीफ आणि हाय रिलीफ असे दोन प्रकार असतात. लो रिलीफची जाडी फार कमी असते. याउलट हाय रिलीफची जाडी अधिक असते. किंबहुना हा भिंतीपासून खूप बाहेर उठलेला दिसतो. इजिप्तच्या पिरॅमिडस्मध्ये आपल्याला लो रिलीफ पाहायला मिळतो. तर ग्रीक शिल्पांमध्ये हाय रिलीफ असतो. पुण्यात टिळकवाड्यासाठी मी म्युरल्सचं काम केलं आहे. मा. जयंतराव टिळक ह्यांनी मला हे काम दिलं. यात मी सावर्जनिक शिवजयंती व गणेशोत्सवाचे म्युरल्स तयार केलेत.

सुनील इंदुवामन ठाकरे: पुतळ्यांबद्दल काय सांगाल?
अशोक सोनकुसरे: पुतळे हे राउंड स्कल्प्चर्स असतात. हे व्यक्तीचे आणि काल्पनिकही असतात. पुतळे हे अर्धाकृती, पूर्णाकृती, उभे अथवा बसलेले असतात. यवतमाळातील आकाशवाणी चौकातील लोकनायक बापूजी अणे ह्यांचा बस्ट म्हणजेच अर्धाकृती पुतळा मी तयार केला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे आगरकरांचा, अचलपूर येथे प्राचार्य राम शेवाळकर यांचा पुतळा मी तयार केला आहे. मध्यप्रदेशातील चित्रकुट येथे माझ्या कामांमधील विविधता आपणास पाहावयास मिळेल. इथे म्युरल्स, डायोरामा, पुतळे अशी अनेक कलाकृती मी तयार केल्या आहेत.

डायोरामामध्ये गणेशोत्सवात जसे देखावे तयार करतात तसाच हा भाग असतो. यात चित्र असतात, मूर्ती असतात. म्युरल्सदेखील असतात. यांचा सुरेख संगम म्हणजे डायोरामा. सोलापूर येथील शिवस्मारकात माझे 120 फुटांचे म्युरल्स आहेत. यात शिवजन्मापासून तर राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजयापर्यंतचे प्रसंग म्युरल्समध्ये तयार केले आहेत. तेथील गेटचे डिझाईन केले. आणि सगळ्यात मोठी 24 फुटांची हनुमानाची मूर्ती त्याठिकाणी उभारली आहे. उल्लेखनीय असं काम म्हणाल तर पुण्यातील टिळकवाड्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा पुतळा मी तयार केला आहे. त्यात टिळकांच्या हातातील पुस्तक, बाजूला ठेवलेले पानाचे तबक वगैरे डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतील.

सुनील इंदुवामन ठाकरे: थोडं या कलांच्या तांत्रिक बाजूंबद्दल माहिती द्या.
अशोक सोनकुसरे: शिल्प, पुतळा हा व्यक्तीचा स्वभाव दर्शविणारा असावा. एखादी व्यक्ती जशी असेल तशा मटेरिअल्सचा वापर अपेक्षित असतो. कणखर बाण्याच्या व्यक्तिमत्त्वांचे शिल्प हे रफ मटेरियलमध्ये असावेत. नाजूक, भावनिक तथा आध्यात्मिक विषय हे मार्बलमध्ये केल्यास जास्त परिणामकारक ठरतात. शिल्प अथवा पुतळ्यांचा आकार लोकेशननुसार ठरतो. त्याच्यावर येणारा सूर्यप्रकाश व सावल्यांचादेखील विचार केला जातो. प्रकाशयोजना कटाक्षाने पाहिली जाते.

सुनील इंदुवामन ठाकरे: रंग कोणकोणते वापरले जातात?
अशोक सोनकुसरे: विषयाच्या मागणीनुसार रंगांची निवड केली जाते. वॉटर कलर्स, पोस्टर कलर्स, ऑईल कलर्स असे रंगांचे काही प्रकार प्रामुख्याने वापरले जातात. यातील ऑईल कलर्समध्ये कलावंताला मनाप्रमाणे काम करण्याचा आनंद मिळतो. हे ऑईल कलर्स पंधरा दिवस वाळेपर्यंत सांभाळावे लागता. गंमत म्हणजे यात जवसाचं तेल असतं. रंग कोणतेही का असेना खरं कौशल्य ब्रशच्या स्ट्रोकमध्ये असतं. कलाकाराचा स्वभावदेखील त्याच्या कलाकृतीमधील स्ट्रोकवरून लक्षात येतो.

सुनील इंदुवामन ठाकरे: कोणकोणत्या मटेरियल्सचा वापर केला जातो?
अशोक सोनकुसरे: मृदा म्हणजेच माती हा सर्वात पहिला महत्त्वाचा घटक होय. सूक्ष्म कणांची शाडू माती सर्वोत्कृष्ट असते. ही माती वर्षभर आपल्याला ओली ठेवता येते. मॉडेल शाडू मातीत तयार केले जाते. त्याचा प्लास्टर ऑफ पॅरीसचा साचा तयार करतात. हा साचा मूर्तीचा किंवा कलाकृतीचा आकार मोठा असल्यास चार ते पाच भागांचा असतो. या साच्यातून फायबर ग्लास, सिमेंट, पीओपी, ब्रांझ, पंचधातूचे वगैरे पुतळे तयार केले जातात. पूर्वी सप्तधातूंच्या पुतळ्यांत सोने आणि चांदीचाही वापर करीत. मोल्डचे प्रमुख प्रकार म्हणजे मदर मोल्ड आणि पीस मोल्ड. मदर मोल्ड एकदाच वापरला जातो. त्यानंतर तो मूळ कलाकृतीपासून तोडूनच वेगळा करावा लागतो. पीस मोल्ड मात्र वारंवार वापरता येतो. भगवान बुद्धांचा पंचधातूचा पुतळा नागपूरला सुदामा टॉकीज परिसरात मी दिलेला आहे.

सुनील इंदुवामन ठाकरे: धातूची मूर्ती तयार करण्याच्या कोणत्या पायऱ्या असतात?
अशोक सोनकुसरे: पहिल्यांदा शाडू मातीची मूर्ती तयार करावी लागते. मग पीओपीचा मोल्ड तयार करतात. त्यातून पीओपी अथवा फायबर ग्लासची मूर्ती तयार करतात. त्यावरून पीस मोल्ड काढतात. याच पीस मोल्डमधून मेणाची मूर्ती तयार केली जाते. याचा साचा तयार झाला की त्यात वितळलेला धातू ओतला जातो. हा धातू मूर्तीच्या संपूर्ण आकारापर्यंत पोहचण्यासाठी रनर्स तयार केले जातात. हवा मोकळी होण्यासाठी रायजर्स तयार करावे लागतात. द्रवरूपातील धातू कायम राहावा म्हणून त्याची धार कायम ठेवावी लागते. थंड केल्यावर रनर्स व रायजर्सचे बाहेरील भाग कापावे लागात. बेंगलुरू कवलांचा चुरा, विटांचा चुरा, भाजलेले पीओपीचे तुकडे, यांच्यासह हे आठ ते दहा दिवस भट्टीत ठेवले जातात. या पद्धतीने संपूर्ण मेण काढले जाते.

टॅपिंग, ग्राइंडिंग, अॅसीडवॉश, वेल्डिंग, हात किंवा इतर भागांची जोडणी व विविध पद्धतीने त्याचे फिनिशिंग केले जाते. ब्रांझ धातू असल्यास कोल्ड किंवा हॉट प्रोसेस वापरतात. मूर्ती छोटी असल्यास पाला-पाचोळा जाळला जातो. अशा रीतीने ऑक्सिडायझनिंग झालं की तारेच्या ब्रशचा वापर करतात. अॅल्युम्युनियमच्या मूर्तींसाठी अॅनॉडायझिंग करावं लागतं.

सुनील इंदुवामन ठाकरे: होमवर्क काय करावं लागतं?
अशोक सोनकुसरे: कोणतेही शिल्प, मूर्ती अथवा कलाकृती तयार करताना विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विषय इतिहासाशी निगडीत असेल तर त्या व्यक्तीविशेषाचा, तत्कालीन परिस्थिती, वेशभूषा, राहणीमान, वस्तू अशा अनेक तपशिलांचा अभ्यास केलाच पाहिजे. लाईव्ह मॉडेल्सला पाहून मूर्ती करताना मी तर बराच वेळ ती इमेज मेंदूत फीट करण्यासाठीच निरीक्षण करतो. समजून घेतो. मग कामाला आरंभ करतो.

सुनील इंदुवामन ठाकरे: कम्प्युटर्सच्या युगात पारंपरिक पद्धतीचं अस्तित्त्व धोक्यात आहे काय?
अशोक सोनकुसरे: मी माझ्या कामसाठी कम्प्युटर्सचा वापर टाळतोच. शेवटी ते यंत्र आहे. आपण खूप कमी वेळात कम्प्युटर्सने बरंच काही करू शकतो. मात्र यात जिवंतपणा नसतो. हाताच्या स्ट्रोक्सची मजा यात येत नाही. हाताने काढलेली साधी रेषा का असेना, ती डायरेक्ट हार्टमधून येते. ती थेट आत्म्याला स्पर्श करते. शॉर्टकट्सचा वापर करून तुम्ही बिजनेस करू शकता. प्रामाणिक सृजनशिलतेचा आनंद घेऊ शकत नाही. मोबाईल, टिव्ही अथवा कम्प्युटरवर गाणे किंवा कविसंमेलन ऐकणं आणि त्याचा प्रत्यक्ष मैफलीत बसून आस्वाद घेणे यात जो फरक आहे तोच इथे आहे. निर्मितीचाही रसास्वाद थेट घेतला पाहिजे.

सुनील इंदुवामन ठाकरे: या कलाक्षेत्रांत प्रवेश करणाऱ्यांमधे कोणते प्राथमिक गुण असणं अपेक्षित असतं?
अशोक सोनकुसरे: चिकाटी व पेशन्स ठेवावे लागतात. डोळे उघडे ठेवून निरीक्षण करावं लागतं. चर्मचक्षूंनीच केवळ पाहून चालत नाही तर अंतःचक्षूदेखील या निरीक्षणात असावेत. या दोन्ही चक्षूंनी पाहिल्यावर मेंदूच्या हार्डडिस्कमध्ये स्टोअर करावं. प्रत्यक्ष निर्मितीला लागल्यावर सगळं बाहेर यायला हवं. अभ्यासूवृत्ती हवीच. मधमाशीसारखं सगळ्याच ठिकाणांहून जे जे मिळेल ते ते घ्यावं. मी आजही अनेकांनी तयार केलेल्या मूर्तींचा अभ्यास करतो.

सुनील इंदुवामन ठाकरे: निसर्ग आणि कला यांच्यात काय नातं तुम्हाला जाणवलं?
अशोक सोनकुसरे: कला ही निसर्गाची कॉपीच असते. सृष्टीत निर्जीव काहीच नाही. अगदी दगड, माती, डोंगर, नदी, समुद्र हे सर्वच जण आपल्याशी संवाद साधतच असतात. सगळेच रंग या सृष्टीत आहेत. अॅबस्ट्रॅक्ट जे म्हणतात ना तेही या सृष्टीतच आहे. निसर्गाच्या बाहेर काहीच नाही. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ व संशोधक जगाला माहीत नसलेलं काहीतरी अद्भूत् देतात. कलादेखील तेच काम करते. निसर्गाचे होऊन जगण्याचा आनंद व आस्वाद घ्या. तीदेखील एक कलाच आहे आणि आपण सर्वच कलावंत आहोत.

सुनील इंदुवामन ठाकरे: या दिलखुलास संवादासाठी धन्यवाद !
अशोक सोनकुसरे: नमस्कार….

अशोक सोनकुसरे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान…..

प्रभातचे सिनेकलावंत चंद्रकांत मांढरे यांच्या हस्ते 1993 साली रत्नागिरी येथे राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले. 1994 ला जेष्ठ कवी साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते एकाच कलाकृतीला 3 पारितोषिके मिळालीत. नेहरू सेंटर मुंबई, वाय. बी. चव्हाण, आर्ट गॅलरी, मुंबई, जहागीर आर्ट गॅलरी, मंबई, वेस्ट झोन कल्चरल सेंटर उदयपूर द्वारा बडोदा येथे आयोजित मेटल स्कल्प्चर कॅम्प अशा अनेक ठिकाणी आयोजित विविध प्रदर्शनी, कार्यशाळा व कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. खामगाव, उदयपूर, केशरीवाडा पुणे, फर्ग्युसन कॉलेज पुणेसह देश-विदेशासह अनेक उल्लेखनीय कलाकृती आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.