पंकज डुकरे, कुंभा: सांगली कोल्हापूर येथे प्रचंड पुराने जीवित व वित्तहानी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगातून अनेक लोक सावरलेले नाही. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर करण्यासाठी कुंभावासियांकडून ३० क्विंटल जीवनावश्यक वस्तू आणि अन्य साहित्य शिरूळ तालुक्यातील दुर्गम शिरडोल गावात वाटप करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रात मागील आठवड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील नागरिकांवर संकट ओढवले. याकरिता कुंभावासियाकडून सामाजिक भान राखत गावातून मदत फेरी काढण्यात आली. कुंभा गावातील युवकांनी पुढाकार घेतला. त्यावेळी गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत १४ क्विंटल कणिक, १५क्विंटल तांदूळ, १क्विंटल डाळ, नवीन कपडे आदी साहित्य शिरूळ तालुक्यातुल शिरडोल गावात पूरग्रस्तांना घरोघरी पोहचविण्यात आले. यावेळी अरविंद ठाकरे, दिलीप पावडे, अनंता महाजन, मारोती मुप्पीडवार, विजय ठाकरे, रोहण आदेवार, प्रवीण डाहुले, लखन राऊत, हरी वाघ आदी हजर होते.