सर्वसामान्य ग्राहक व व्यापा-यांचे वीज बिल माफ करा
संभाजी ब्रिगेड झरीतर्फे उर्जामंत्र्यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 19 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनता चिंताग्रस्त आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी मासिक लॉकडाऊनमधील तीन महिने व त्यानंतरचे 3 महिने असे एकून सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या झरी शाखेतर्पे करण्यात आली आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांना इमेलद्वारा निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
करोना विषाणूच्या संकटाच्या काळात सरकारकडून गरीब जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे. तसेच या काळात व्यवसायिक व छोट्या व्यापारी वर्गाने दुकाने बंद करून शासनाच्या निर्देशाला सहकार्य केले. त्यामुळे ते देखील मोठ्या अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय तसेच व्यावसायिक ग्राहकांना वीज बिल भरणे अडचणीचे आहे.
वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे झरी तालुकाध्यक्ष देव येवले यांनी ईमेलद्वारा डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.