चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

वनोजा जवळ झाला अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी: वरोरा तालुक्यातून कार्यक्रमासाठी दुचाकीने वणी तालुक्यात आलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा रोडवर वनोजा जवळ हा अपघात झाला. शुभांगी पुंडलीक व-हाटे (48) असे मृत महिलेचे नाव आहे. 

पुंडलीक व-हाटे (55) व त्यांच्या पत्नी मृत शुभांगी पुंडलीक व-हाटे या वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील रहिवासी आहे. रविवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी हे दाम्पत्य एका कार्यक्रमानिमित्त त्यांच्या दुचाकीने वणी तालुक्यातील लाखापूर येथे आले होते. कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी पुंडलीक व शुभांगी हे दुचाकीने नांदेपेरा मार्गे गावी परतत होते. दरम्यान 6 वाजताच्या सुमारास वनोजा देवी जवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात पत्नी शुभांगीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती पुंडलीक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला आहे.

घटनास्थळावरील लोकांनी दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शुभांगी यांना मृत घोषीत केले. प्रकृती गंभीर असल्याने पुंडलीक यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धडक देणारे वाहन हे एक काळ्या रंगाची थार असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. पोलीस धडक देणा-या वाहनाचा शोध घेत आहे. घटनेचा तपास जमादार संतोष आढाव करीत आहे. 

Comments are closed.