जिल्हा बँकेतील बोगस एफडीआरचा मुद्दा थेट विधानसभेच्या अधिवेशनात

आ. संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला प्रश्न

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक व पाटण येथील शासकीय कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांनी बनावट FDR (मुदत ठेव पावती) तयार करून कंत्राट मिळवल्याचा आरोप काही दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला होता. आता हा प्रश्न त्यांनी आज थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला आहे. अधिवेशनात लक्षवेधीमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याची सखोल चौकशी करून कारवाईची ग्वाही दिली. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सहकार क्षेत्रात पकड असलेले आमदार राधाकृष्ण पाटील यांनी देखील या प्रकरणी आक्रमक होत संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली. हा मुद्दा आता थेट विधिमंडळात उपस्थित झाल्याने या प्रकरणी पुढे काय कार्यवाही होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या काळात आज दिनांक 24 मार्च रोजी लक्षवेधीमध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सदर मुद्दा उपस्थित करत बँकेच्या संचालकावर घाणाघात केला. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतक-याची बँक असून ती शेतक-यांच्या भागभांडवलावर उभी झालेली बँक आहे. मात्र बँकेचा संचालकच स्वत: भ्रष्टाचार करतो तेव्हा विश्वास कुणावर ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यवस्थापकाला निलंबन केल्याने हा प्रश्न सुटणार नसून सहकार आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी व संचालकाला तात्काळ अपात्र ठरवावे अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विधानभवनात केली.

प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कंत्राटदार हाच संचालक असल्याने हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणी व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी लेखा परिक्षक यांच्या मार्फत केली जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी देखील भ्रष्टाचार झाल्याचे कबुल करूनही चौकशीचा फार्स करण्याऐवजी संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

काय आहे हे प्रकरण?
जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ क्र. 1 कडून मंजूर झरी तालुक्यातील 7 आणि केळापूर तालुक्यातील 2 कामासाठी कंत्राटदार आर.एम.येल्टीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाटण शाखेचे 18 लाख 10 हजार रुपयांचे संकल्प मुदत ठेव योजनेचे बॉण्ड विभागाकडे जमा केले होते. सदर एफडीआर संगणीकृत नसून हस्तलिखित असल्यामुळे ते बनावट असल्याचा संशय आला. याबाबत बांधकाम विभागाने खातरजमा केली असता दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेच्या पाटण शाखेतून फक्त 10 हजार रुपयांचा मुदत ठेव असल्याचा खुलासा झाला.

याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी माहिती काढली असता बँक संचालक व कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार, रा. पाटण ता. झरीजामणी यांनी पाटण येथील शाखा प्रबंधक सोबत संगनमत करून 18 लाख रुपयांची बनावट मुदत ठेव पावत्या (FDR) तयार करून बांधकाम विभागाकडे जमा केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आ. बोदकुरवार यांनी सहकार आयुक्त, पुणे व प्रधान सचिव, सहकार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडे लेखी तक्रार केली.

हे देखील वाचा:

Comments are closed.