पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाठी परिसरात नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोठा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ॲड. राहुल खारकर मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांना नव्या आशेचा किरण मिळाला.
लाठीसह निवली, बेसा, भालर, मंदर आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण 162 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 51 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले.
या सर्व रुग्णांना 9 ऑक्टोबर रोजी महात्मे हॉस्पिटल, नागपूर येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांची ये-जा, राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून, आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना आधार मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश यावा, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील नागरिकांनी मोठे सहकार्य केले.

यामध्ये पोलिस पाटील संजीवनी खिरटकर, आशा सेविका सुनीता डवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रीना लाडे, मुकेश खिरटकर, रितेश लाडे, शुभम टोंगे, गुरुदेव सेवा मंडळाचे आशिष माहूरे, नंदू माहूरे, नीलेश करडे, गणेश माहूरे, सागर मोते, ईश्वर माहूरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.


Comments are closed.