साश्रु नयनांनी बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर – वणी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा येथील वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना एकटक पाहत शेवटचं दर्शन घेतलं. पत्नीचे दुःख पाहून उपस्थितांनाही आपले अश्रु आवरता आले नाही. दिवंगत बाळू धानोरकर यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी मुखाग्नी दिली. हे दृश्य मन हेलावणारे होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांनीही हजेरी लावली होती.

धानोरकरांचे पार्थिव मंगळवार दुपारी त्यांच्या वरोरातील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते. बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यातील नेते उपस्थित होते. केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ व इतर भागातील कार्यकर्तेही आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी वरोरा येथे आले होते.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, आशिष जयस्वाल, अमोल काळे, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, किशोर जोरगेवार, मनसे नेता राजू उंबरकर यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने मुकुल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी चक्र अर्पण केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

बाळू धानोरकरांच्या पार्थिवावर चंद्रपूरच्या वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. वरोरा शहरातल्या मोक्षधाम येथे प्रशासनाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने मोक्षधाम येथे तयारी करण्यात होती. हजारो कार्यकर्ते -पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होती. यावेळी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.

बाळू धानोरकर यांना 26 मे रोजी नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांनी मंगळवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांआधीच त्यांचे पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले होते.

Comments are closed.