कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या 45 गोवंश जनावरांची सुटका, 5 तस्कर अटकेत

जितेंद्र कोठारी, वणी: स्था. गुन्हा शाखा पथकाने (LCB) मंगळवार 30 मे रोजी केलेल्या एका कारवाईत गोवंश तस्करांच्या तावडीतून 45 जनावरांची सुटका केली. मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते रोहपट मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 5 गोवंश तस्करांना अटक केली. एलसीबी पथकाने केलेल्या या कारवाईवरून वणी उप विभागातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी होत असल्याची बाब पुन्हा उघड झाली आहे.

मारेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एलसीबी पथकाला काही इसम हे रोहपट येथून 40 ते 50 गोवंश जनावरे कळपाने आंबेझरी, बोरगाव, शिबला, माथार्जून, दिग्रस मार्गे कत्तलीकरिता घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीवरुन एलसीबी पथकाने करणवाडी ते रोहपट मार्गावर सापळा रचला. तेव्हा 5 इसम पायदळ बैलांचा कळप घेऊन जाताना दिसून आले.

निर्दयीपणे बैलांच्या गळ्यात फास टाकून घेऊन जाणाऱ्या इसमांना पोलिसांनी विचारपूस केली असता जनावर कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली. कबुलीवरून पोलिस पथकाने जनावर घेऊन जाणाऱ्या तस्लीम खाँ वहाब खाँ कुरेशी, मुकुंदा कलप्पा जाधव, सुनिल शामराव गुंजेकार, शंकर संभा भोजेवार व उमेश जनार्धन चाफले यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 45 गोवंश जनावरांची सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या गौवंश जातीच्या जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशाळा येथे पाठविण्यात आले असून आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंघे, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी पार पाडली.

Comments are closed.