जेवणाच्या ऑर्डरवरून भांडण, लाकडी दांडक्याने ढाबा चालकाचा खून

घटना कशी घडली? आरोपींनी कसा केला क्रूर हल्ला?

बहुगुणी डेस्क, वणी: मार्की (बु.) येथील एका ढाब्यावर किरकोळ वादातून भीषण हत्याकांड घडले आहे. मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास दोघा आरोपींनी ढाबा चालकाला झोपेत असताना लाकडी दांडक्याने डोक्यात अनेक वार करून त्याचा क्रूर खून केला. घटनेच्या अवघ्या काही तासांत मुकुटबन पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला.

मृतक गजानन उर्फ आझाद मोरेश्वर उदकवार (32, रा. मार्की बु.) हा गेल्या काही वर्षांपासून मार्की (बु.) गावाजवळ ढाबा चालवला होता. आरोपी सचिन सुधाकर टोंगे (30) आणि साहिल राजेश काकडे (38, दोन्ही रा. मार्की बु.) मंगळवारी रात्री जेवणासाठी ढाब्यावर आले होते. जेवणाच्या ऑर्डरवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

मात्र आरोपींनी वादाचा राग मनात धरून ठेवला. ढाबा बंद झाल्यानंतर रात्री उशीरा ते पुन्हा ढाब्यावर आले. झोपलेल्या गजानन उदकवार यांच्यावर त्यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात सपासप वार करण्यास सुरुवात केली. एकामागून एक अनेक वार झाल्याने उदकवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. इतका क्रूर हल्ला होता की, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

खून केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रात्री गजानन धाब्यावरच झोपत होता. त्यामुळे रात्री घरी न परतल्यामुळे कुणाला संशय आला नाही. मात्र सकाळी ढाब्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

मुकुटबन पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहितीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वेगाने तपास केला. अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी मुकुटबन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.