सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी गणेश विसर्जन आहे. तेव्हा बाप्पांना न्यायला पोलीसच येतील. वाचून किंवा ऐकून थोडं वेगळं वाटेल. तरीदेखील आपण त्यांना पूर्ण सहकार्य करा. विसर्जनाचा सोहळा आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित करा. ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार संपूर्ण जिल्ह्यात राबवीत आहेत. या संकल्पनेला नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी केली.
पोलीस न्यायला आलेत, की धडकी भरते काळजात. मात्र पोलीस कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी गणेश विसर्जनात आपल्या मदतीसाठी येत आहेत. यंदा कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे या बाबी प्रामुख्याने कराव्या लागतात. हीच बाब यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्षात घेतली. त्यातून विसर्जनरथ ही संकल्पना पुढे आली.
दरवर्षी वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50च्या आसपास सार्वजनिक गणपती बसतात. त्या तुलनेने यंदा फक्त 31 गणपती सार्वजनिक आहेत. त्यातही हे गणपती एखाद्या मंदिरात किंवा कुणाच्यातरी घरी बसवलेत. त्यातही यावर्षी विसर्जनाची कोणतीच मिरवणूक राहणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंगाने ताण राहणार नाही.
तरीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त या उत्सवात आहे. पोलीस विभाग सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. सार्वजनिक गणपतींपैकी 12 गणपतींचे जागेवरच विसर्जन होईल. 13 गणपती हे विसर्जनरथांवरून जातील. ग्रामीण भागात केवळ सहाच गणपती आहेत. त्यांचंही विसर्जन जागेवरच होईल. अशी माहिती वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिली.
पोलीस येतील आपल्या दारी
‘बाप्पा विसर्जन करा घरच्या घरी, पोलीस येतील आपल्या दारी’ हे यंदाचं स्लोगन पोलीस विभागाने विसर्जनसाठी ठेवलं. पोलीस निरीक्षक जाधव माहिती देत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे हे प्रथम कार्य आहे. त्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं तेवढंच आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या यंदा कमी झाली. पोलीसांचं काम मात्र कमी झालं नाही. कोरोनाच्या या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांचेही आम्हाला विशेष सहकार्य लाभत आहेत. पुढेदेखील नागरिकांकडून अशीच सहकार्याची अपेक्षा करतो.
-वैभव जाधव, पोलीस निरीक्षक, वणी