गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

भाविकांसाठी विविध सोयीसुविधांची व्यवस्था

0

विवेक तोटेवार, वणी: गणरायाच्या विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाली असून विसर्जन कुंड, निर्माल्य कलश व मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी क्रेन अशा सुविधांसोबतच भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

वणीत घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही गणेशोत्सवाची धूम असते. गणेश विसर्जनाच्या वेळी कोणताही गोंधळ उडू नये तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी नगरपालिकेने यावर्षी विशेष व्यवस्था केली आहे. त्यासाठी विसर्जनस्थळाची दुरुस्ती तसेच या परिसराची साफसफाई करण्यात आली आहे.

वणीमध्ये तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दोन ठिकाणी घरगुती गणेश विसर्जनासाठी तर एका ठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. वामनघाट तसेच टिळक चौक इथे घरगुती गणेश विसर्जनासाठी तर गणेशपूर घाट इथे सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी कुंड आणि निर्माल्य कलश बसवण्यात आला आहे.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी गेल्या आठ दिवसांपासून नगरपालिका प्रशासन जय्यत तयारीला लागले होते. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे स्वतः या ठिकाणी जातीने हजर राहून या कामाचा पाठपुरावा करत होते. अखेर हे काम आता पूर्ण झाले आहे. गैरसोय टाळण्यासाठी विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इथे प्रथमोपचार कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांना माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे.

गणेश विसर्जनाबाबतच्या तयारीविषयी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की...
गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. यादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यावर्षी सुरक्षा आणि प्रदूषण याकडे विशेष लक्ष दिलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जनासाठी त्रास होऊ नये म्हणून क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी घाटावर कुंड, निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान गर्दी होऊन कोणताही गोंधळ उडू नये साठी आम्ही विशेष काळजी घेत भाविकांच्या सोयी सुविधांसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.