तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

मध्यरात्रीची घटना, अपघातानंतर दोघेही रात्रभर घटनास्थळी पडून

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री उशिरा मित्राला सोडून देण्यासाठी तेजापूरला जाणा-या दुचाकीचा गणेशपूर (खडकी) शिवारात भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने एका म्हशीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही तरुणांना मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातानंतर दोघेही रात्रभर घटनास्थळी पडून होते. अती रक्तस्राव व वेळेत उपचार न मिळाल्याने या दोघांसाठी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मृतक गणेश कैलास टेकाम (17) हा मोहदा ता. वणी येथील रहिवासी होता. तो शिरपूर येथील गुरुदेव विद्यालयात 12 वीचा विद्यार्थी होता. तर मृतक रोहित माणिक मरसकोल्हे (अंदाजे 19) हा तेजापूर ता. वणी येथील रहिवासी होता. या दोघांची मैत्री होती. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी गणेशचा पेपर झाल्यानंतर तो रोहितसोबत होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास तो पल्सर या दुचाकीने (MN49 AX2895) रोहितला सोडण्यासाठी तेजापूर येथे जात होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुचाकीची म्हशीला धडक
दरम्यान रात्री गणेशपूर शिवारात दुचाकीने भरधाव जात असताना रस्त्याच्या मध्ये म्हैस आडवी आली. या म्हशीला जबर धडक दिल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व दोघेही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळले. अपघातात दोघांच्याही डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याच्या ठिकाणी एका म्हशीच्या शेपटीचा तुकडा पडलेला आढळला तसेच 100 फुटांवर एक म्हैस जखमी अवस्थेत आढळली. त्यामुळे म्हशीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

रात्रभर दोघेही जखमी अवस्थेत
अपघात झाल्यानंतर दोघेही रात्रभर घटनास्थळी पडून होते. पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून जाणा-या काही लोकांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

गणेशपूर-तेजापूर हा रस्ता जंगली भागातून जातो. या मार्गाने अनेक लोक रात्री उशिरा प्रवास करणे टाळतात. गणेश रात्री उशिरा रोहितला सोडून देण्यासाठी का गेला? तसेच ते दोघे रात्री उशिरापर्यंत कुठे होते, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. गणेशचे वडील आधीच अपघातात मरण पावले. तो आजी, आई आणि एक लहाण भावासह राहत होता.

रोहितच्या वडिलांचा ट्रान्सपोर्ट व वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. तो वडिलांना मदत करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे मोहदा व तेजापूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

Comments are closed.