वणीतील सर्वात मोठ्या घरफोडी पैकी एका घरफोडीचा लागला छडा

साधनकर वाडीत 15 लाखांची घरफोडी करणारी चोरट्यांची टोळी जेरबंद

विवेक तोटेवार, वणी: शहरातील साधनकर वाडीत झालेल्या 15 लाखांच्या जबरी घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 3 फेब्रुवारीच्या सकाळी ही घरफोडीची घटना उघडकीस आली होती. वणीतील सर्वात मोठ्या घरफोडीपैकी ही एक घरफोडी होती. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केलेल्या कारवाईत या घरफोडीचा छडा लागला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे वर्धा जिल्ह्यातील तर एक आरोपी वरोरा येथील आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या अटकेमुळे वणीतील आणखी घरफोड्यी उघडकीस येईल का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

काय होती घरफोडीची घटना?
प्रदीप चिंडालिया हे एका विमा कंपनीचे सेवानिवृत्त डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांसह साधनकरवाडी येथे राहतात. दिनांक 25 जानेवारी रोजी ते कुटुंबीयांसह दक्षिण भारतात देवदर्शनाला गेले होते. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी केअर टेकर घरी आली होती. तिला किचनचे दार उघडे दिसले. तिने आत जाऊन बघितले असता तिला घरफोडी झाल्याचे लक्षात आले. तिने याची माहिती घरमालकाला दिली. प्रदीप चिंडालिया यांनी तातडीने याची माहिती त्यांचा नागपूर येथे नोकरी करीत असलेल्या त्यांच्या मुलाला दिली. घटनेची माहिती मिळताच मुलगा अक्षय प्रदीप चिंडालिया हा नागपूरहून वणीला आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याला लक्षात आले की चोरट्यांनी घराचे पुढच्या दाराची कुंडी कापून आत प्रवेश केला. कपाटाच्या चाव्या घरीच ठेऊन असल्याने त्यांना चाव्या शोधण्यास विलंब लागला नाही. त्यांनी चाव्या शोधून लोखंडी व लाकडी कपाटातून सोने, चांदी व नगदी असा एकूण 14 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात दोन लाख रुपये रोख, 5 तोळ्याच्या 4 सोन्याच्या बांगड्या (2.5 लाख), 2 सोन्याच्या अंगठ्या (50 हजार), 5 तोळ्यांची सोन्याची चैन (2.5 लाख), 2 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र (1 लाख), 4 नग कानातील सोन्याची रिंग (50 हजार), सोन्याचा नेकलेस (1 लाख), पाच किलो चांदिच्या विटा (3.75 लाख), तसेच इतर सोने चांदी असा सुमारे 14 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 331 (3), 331 (4), 305 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला चोरीचा छडा
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यातील एका घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनिल उर्फ रॉकी शांताराम शिंदे, वय 23 वर्ष रा. बोरगाव टेकडी, ता. जि. वर्धा व चंदू हिरा बदखल वय 39 वर्ष रा. हनुमान वार्ड वरोरा जि चंद्रपूर यांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून आणखी कुठे घरफोडी केली याची विचारणा केली असता त्यांनी वणीत केलेल्या घरफोडीची कबुली दिली. वर्धा येथील पोलिसांनी याची माहिती वणीचे ठाणेदार गोपाळ उंबरकर यांना याबाबत माहिती दिली. ठाणेदार यांच्या आदेशाने पो उपनि धीरज गुल्हाने (तपास पथक प्रमुख) पोलीस स्टेशन वणी, पोकॉ. मो वसिम, पोकॉ. निरंजन हे वर्धा येथे गेले व त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

चौकशीत या टोळीतील आणखी एक आरोपी अरबाज सत्तार खान पठान वय 23 वर्ष रा तळेगाव जि. वर्धा याचे नाव समोर आले. वणी पोलिसांनी त्याच्या पो स्टे अलीपूर हद्दीतील धोत्रा फाटा जि वर्धा येथून मुसक्या आवळल्या. या तिन्ही आरोपींना वणीत आणण्यात आले. शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या अटकेमुळे वणीतील आणखी काही घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लागणार का? याची सर्वच वणीकरांना उत्सुकता लागली आहे.

सदरची कारवाई गणेश कींद्रे उपविभागीय पोलीस अधीकारी वणी, गोपाळ उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि धिरज गुल्हाने पो कॉ मो वसीम, पोकॉ निरंजन, पो कॉ मोनेश्वर, पो कॉ गजानन तपास पथक वणी यांनी केली. घटनेचा तपास पोउनि धीरज गुल्हाने करीत आहे.

Comments are closed.