बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये सोमवारी दिनांक 17 जून रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिल कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत चालणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक असल्याचे समोर आले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात यावी या मागणीसाठी ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाव’ हे राज्यस्तरीय आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
मतदानासाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशिनबाबत अनेक घोळ समोर आले आहेत. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 350 मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत तफावत आढळून आली आहे. या आकडेवारीमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत आठ दिवसात सविस्तर खुलासा करावा व येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडी, भारिप, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सर्वसामान्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मंगल तेलंग, मिलिंद पाटील, किशोर मून, डॉ. प्रशिक बरडे, भवानी मांदाडे, प्रशांत गाडगे, पांडुरंग पंडिले, अमोल गुरनुले, मनोज मोडक यांनी केले आहे.