बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

संजय देरकर यांच्या वाढदिवशी अभियानाला सुरूवात

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना आता कामाला लागली आहे. दिनांक 17 जानेवारीपासून शहरात ‘घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य सांधून या अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी केली जाणार आहे. शहरात शिवसेनेशी जुळू इच्छिणा-या तरुण तरुणांनी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. येत्या काळात वणी नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज असून ‘घर तिथे शिवसैनिक’ हे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. सदर अभियान पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर, वणी विधानसभा संपर्कप्रमुख विनोद पेडणेकर, शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणार आहे.

यावेळी नगरपालिकेवर भगवा फडकवा- राजू तुराणकर
शहरवासीयांच्या समस्या सोडवण्याचा शिवसेना नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. शिवसेनेशी अधिकाधिक लोकांनी जुळावे यांसाठी एक पाऊल पुढे टाकत आता शिवसैनिकच ‘घर तिथे शिवसैनिक’ या अभियानांतर्गत नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी करणार आहे. प्रत्येक घरी शिवसैनिक असलाच पाहिजे हे या अभियानाचे ध्येय आहे. यासह घरोघरी जाऊन शिवसैनिक वार्ड आणि जनतेच्या समस्या देखील जाणून घेणार आहे.
– राजू तुराणकर: शहर प्रमुख, शिवसेना

या अभियानात सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, शिवसेना समर्थक यांनी जुळावे व हे अभियान यशस्वी करावे, तसेच जे शिवसेनेशी जुळण्यास इच्छुक आहेत त्यांनी शिवसैनिकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.