बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे घरफोडी झाली. शनिवारी रात्री उशिरा घरमालक जेव्हा घरी आले, तेव्हा ही घरफोडी उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्याने 25 हजारांची रोख रक्कम लंपास केली. काही दिवसांच्या कालावधीनंतर घरफोडी करणा-या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहम्मद साकिब शेख (36) हे खासगी व्यवसाय करतात. ते नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे असलेल्या नुर मंजिल या इमारतीत राहतात. शनिवारी दिनांक 12 रोजी दुपारी 03 वाजताच्या सुमारास ते घराला कुलूप लावून व्यावसायिक कामाकरीता घराबाहेर निघाले होते. रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास ते घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील खिडकीची लोखंडी ग्रील तुटलेली आढळली.
ग्रील तोडून चोरट्याने घरातील आलमारी शोधली. त्याला वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुम मध्ये आलमारी दिसली. त्याने लाकडी कपाटात असलेले ड्राव्हर तोडले. तिथे 25 हजार रुपयांची रोख ठेवली होती. चोरट्याने घरात इतरत्र ही काही मौल्यवान वस्तू व रोख शोधण्यासाठी घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. मात्र त्याच्या हाती 25 हजारा व्यतिरिक्त आणखी काही लागले नाही. त्यानंतर चोर घरातून निघून गेला.
मोहम्मद यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम कलम 331(4), 305(A) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात स. फौजदार सुरेंद्र टोंगे करीत आहे. काही दिवसांच्या कालावधीनंतर आता पुन्हा घरफोडी सुरु झाल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे.
Comments are closed.