शेतातून बक-या चोरायचे आणि आठवडी बाजारात विकायचे !

बक-या चोरणारी टोळी गजाआड... 3 अटकेत, 1 फरार

विवेक तोटेवार, वणी: वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील 1 आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ₹3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात फरार आरोपींचा शोध घेत असताना या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

वणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका बकरी चोरी प्रकरणातील आरोपी जत्रा मैदान परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सीताराम आसाराम भिसे (वय 24), सुनील रामप्रसाद साळुंखे (वय 27) आणि संजय राजू वायकर (वय 23, सर्व रा. गोकुळ नगर, वणी) यांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान आरोपींनी वणी परिसरात सन 2024 ते 2026 दरम्यान अनेक बकरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारांमध्ये विक्री केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

या कारवाईदरम्यान आरोपी सुनील साळुंखे याच्याकडून चोरीतील ₹70 हजारांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (MH-29-BE-8012) जप्त करण्यात आले. जप्त वाहनाची किंमत सुमारे ₹3 लाख 10 हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील सचिन वायकर हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींनी पाटण व वडकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील इतर चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंढकर, पोउनि धनराज डाके, पोहेवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोका सलमान शेख आणि चालक पोहेवा नरेश राऊत यांनी केली. 

Comments are closed.