भास्कर राऊत, मारेगाव: आजपर्यंत वाहनचोरांचा तालुक्यामध्ये सुळसुळाट पाहायला मिळत होता. पण आता या चोरांनी आपले लक्ष जनावरे चोरीकडे वळवले असून मारेगाव येथे आज दि. 21 ऑगस्टला पहाटेच्या वेळेस अज्ञातांनी 13 नग बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मारेगाव येथील विजय नामदेव किन्हेकर वय 62 वर्षे हे मारेगाव-वणी रोडवरील पेट्रोलपंप जवळ शेतामध्येच आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्याकडे 7 बकऱ्या व 6 बकरे असे एकूण 13 नग बकऱ्या आहेत.
या बकऱ्यांसाठी त्यांनी टिनाचे शेड बांधलेले आहेत. नेहमीप्रमाणे ते बकऱ्या टिनाच्या शेडमध्ये टाकून निवांत झोपलेले आहे. पहाटे 2 वाजताच्या सुमारास विजय यांना लघुशंका आल्याने ते लघुशंकेसाठी उठले. त्यावेळी बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने जाऊन बघीतले असता एका सीटर वाहनामध्ये अज्ञात व्यक्ती बकऱ्या टाकत असल्याचे दिसले.
त्यामुळे विजय हे जोराने ओरडले. चोर चोर असे म्हणताच अज्ञात वाहनधारक चोरटे अंधाराचा फायदा घेऊन वाहनासाहित पळून गेले. या 13 बकऱ्यांची किंमत अंदाजे 1 लाखाचे वर असल्याचे बोलले जात आहे.
रात्रीच्या वेळेस अंदाजे 2 च्या सुमारास बकऱ्या चोरून नेल्यानंतर बकऱ्या मालक विजय किन्हेकर यांनी लगेचच पोलीस ठाणे गाठत घडलेली आपबीती सांगीतली. कर्तव्यात तत्पर असलेल्या मारेगाव पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रात्रीच सर्वांना फोन करत या चोरांच्या शोधात वणी, कोलगाव, वेगाव, गौराळा, नेत या गावांना भेटी देत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु चोरटे कुठेच अढळून न आल्याने शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून मारेगाव पोलीसांनी अज्ञाताविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार हे स्वतःच करीत आहे.