शासकीय मैदान प्रकरणाचा तिढा अखेर सुटला

जेसीआयने घेतले अखेर एक पाऊल मागे

0

विवेक तोटेवार, वणी: गेल्या तीन दिवसांपासून शासकीय मैदानात होणा-या दांडियाच्या कार्यक्रमावरून वणीतील वातावरण तापले होते. अखेर या प्रकरणावर तोडगा निघाला असून दांडियाचे आयोजक जेसीआय या संस्थेने एक पाऊल मागे घेत हा कार्यक्रम दुस-या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

नवरात्रीमध्ये जेसीआयतर्फे आयोजित दांडियामध्ये शहरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. शिवाय प्रत्येक वर्षी इथ येऊन दांडिया खेळणा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षा आणि अधिकाधिक लोकांना सहभागी करण्याच्या उद्देशाने जेसीआयने यावर्षी शासकीय मैदानात कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. त्यांना शासकीय मैदानात हा कार्यक्रम घेण्यासाठी दहा दिवसांची परवानगी देखील मिळाली. मात्र परवानगी मिळाल्याचे कळताच याविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक झाले. त्यांनी या प्रकरणी आमदारांची भेट ही घेतली होती. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आज एसडीओ आणि तहसिलदारांची भेट घेत निवेदन सादर केले होते.

प्रकरण तापत असल्याचे पाहून जेसीआयने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची तातडीची बैठक बोलवली. सणासुदीच्या काळात वातावरण तापत असल्याचे पाहून तसेच शहरातील शांतता सणा उत्सवाच्या काळात भंग होत असल्याने जेसीआयने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला. तसेच दांडियासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

तहसिलदार आणि एसडीओंना निवेदन देताना क्रीडाप्रेमी

‘वणी बहुगुणी’शी बोलताना जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष सुमीत चोरडीया म्हणाले की…

जेसीआय ही एक सामाजिक संघटना आहे. समाजात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी कार्य करते. सण उत्सवाचा काळ हा आनंदाचा काळ आहे. अशा वेळी विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींच्या भावनांचा आम्ही आदर करतो. समाजात सामाजिक सलोखा कायम असायला हवा. आम्हाला कायदेशीर रित्या परवानगी मिळाली असली तरी सामाजिक दातृत्वाची जाण ठेवून आम्ही जागा बदलवण्याचा निर्णय घेतला आहे.

जेसीआयच्या या निर्णयाचे विविध खेळांशी जुळलेल्या संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. मैदानाचा हा मुद्दा सर्वप्रथम ‘वणी बहुगुणी’या न्यूज पोर्टलने उचलून धरला. या प्रकरणाचा वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर या प्रकरणाचा तिढा सुटल्याने क्रीडाप्रेमींनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

जेसीआय ही एक सामाजिक संघटना असून वणी शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असते. नवरात्रीला दरवर्षी जेसीआयतर्फे दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच गणतंत्र दिनाला शासकिय मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही जेसीआयद्वारा केले जाते. रस्ते सुरक्षा सप्ताह, रक्तदान, भोजनदान, शैक्षणिक मदत इत्यादी कार्यात ही संस्था हिरारीने भाग घेते.

Leave A Reply

Your email address will not be published.