मयत अरविंद घुगुल यांच्या कुटुंबाला शेतकरी आत्महत्येचा लाभ द्यावा

मेंढोली ग्रामविकास जनसंघर्ष समितीची मागणी

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथील अरविंद घुगुल या 49 वर्षीय शेतकऱ्याने 26 ऑगस्टला विष पिऊन आत्महत्या केली. घुगुल यांची आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या ग्राहय धरून त्याच्या कुटुंबीयांना शेतकरी आत्महत्येचा संपूर्ण लाभ ध्यावा, अशी मागणी मेंढोली ग्रामविकास जनसंघर्ष समितीने तहसिलदार वणी यांच्याकडे केली आहे.

कृषी विभाग शेतकऱ्यांना पिकांवरील कीड नियंत्रनासाठी मार्गदर्शन करत नाही. सरकारच्या चुकीच्या निकषांमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. कदाचित घुगुल यांना कर्ज माफीचा संपूर्ण लाभ मिळाला असता, तर त्याने मृत्युला जवळ केल नसतं. मयत अरविंद हा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी ठरल्याचा आरोप संघर्ष समितिने केला आहे.

शेतकरी घुगुलची आत्महत्या ‘शेतकरी आत्महत्या’ ग्राह्य धरून त्याच्या कुटुंबियांना संपूर्ण लाभ देण्याची मागणी मेंढोली ग्रामविकास जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष सूरज बलकी, भुपेंद्र महकुलकर, सचिव रमेश करडभुजे, दिनेश खाडे, अनिल ढवस, विवेक मुके यांनी तहसिलदार वणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

का केली अरविंद घुगुल यांनी आत्महत्या ?

मयत घुगुल यांचे मौजा वडजापूर शिवारात आई व त्याच्या नावे गट क्र. 133, 6 हेक्टर 55 आर सामाईक शेत आहे. मयताच्या नावे य. जि. स. बँक शाखा शिरपूरचे 48,900 तर आईच्या नावे 48,900 रुपयांचे पीक कर्ज आहे. मयत शेतकरी हा नियमित कर्ज भरणारा शेतकरी होता. पण तो सधन नव्हता.

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के वगळता योग्य लाभ मिळाला नाही. यावर्षी हवामान खात्याने पावसाचा चुकीचा अंदाज वर्तविला त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणीला सामोरे जावे लागले.

कशीबशी पेरणी करून पीक उगवले. मात्र पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. मयत अरविंद हा औषध खरेदीसाठी पैशाची तजविज करण्यासाठी नातेवाईकांकडे प्रयत्न करीत होता. घटनेच्या आदल्या दिवशी तो रामपूर येथील बहिणीकडे पैशासाठी गेला होता. पण गरीब बहिणीकडेही पैसे न मिळल्याने परत येऊन रात्री शेत गाठले. नैराश्यातून विष पिऊन जीवन संपविले, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.