सव्वा लाखात घरकुल कसे बांधणार? अनुदान वाढवण्याची मागणी

काँग्रेसचे उपविभागीय अधिका-यांना निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या अनुदानात वाढत्या महागाई दरानुसार वाढ करण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. सध्या घरकुल योजनेसाठी केंद्र सरकार 1 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान देते. मात्र बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घर बांधणे अडचणीचे ठऱत आहे. त्यामुळे किमान 2 लाख 50 हजार रुपये इतकी वाढ करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली. याबाबत काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनांतर्गत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपये अनुदान देते. मात्रे हे तुटपुंजे अनुदान आहे. सन 2015 पासून वाळू, सिमेंट, पत्रे, सळई व लाकूड या बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने घरकुलासाठी दिले जाणारे हे अनुदान अत्यल्प ठरले आहे.

गरीब लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम उभी करणे जिकिरीचे जात आहे. 300 चौरस फूट घरकुलाचे बांधकाम करायचे असेल तर किमान 2 लाख 50 हजार रुपये खर्च येत असल्याने आज ग्रामीण भागातील विशेष करून आदिवासी भागातील अनेक लाभार्थ्यांचे घरकुल हे अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनुदानात तात्काळ वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या योजनेसाठी शहरी भागात किमान 2 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान दिले जात असताना ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी अनुदानात वाढ का केली जात नाही असा सवाल ग्रामीण भागातून विचारला जात आहे. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने अनुदानात वाढ करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनावर विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, नईम अजीज, राजू गव्हाणे, महादेव दोडके, विवेक डवरे, दिनेश पाऊनकर यांच्या स्वाक्षरी आहेत.

हे देखील वाचा: 

शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती

Comments are closed.