‘सिजेरिअन’ प्रसूतीचा तगादा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

प्रसूती तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत नर्स करतात थेट रेफर

0

जब्बार चीनी, वणी: नेहमीच वादाचा भोवऱ्यात अडकलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती मातांची तपासणी न करताच त्यांना खाजगी व चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन पेशन्टला नर्सने सिझेरियनचा तगादा लावून रेफर केले. विशेष म्हणजे दोन्ही मातांची सुखरूप सामान्य प्रसूती (नॉरमल डिलेव्हरी) झाली हे विशेष. मात्र जन्माला आलेल्या बाळाला तपासणीसाठी बालरोगतज्ज्ञ आलेच नसल्याचे विदारक चित्र वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळाले. या भोंगळ कारभाराची एका पेशन्टच्या पतीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय अधिक्षकांचा वचक नसल्याने व खासगी दवाखान्यातील आर्थिक लागेबांधेमुळे तर हा सगळा प्रकार घडत नाही ना असा आरोप केला जात आहे.

सिजरचे कारण देऊन रेफर करण्याचा अट्टाहास का?

प्रकाश भट हे पळसोनी ता. वणी येथील रहिवाशी आहे. दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या पत्नी शीतल प्रकाश भट हिला प्रसूतीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसंगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या मुख्य परिचारिका व सोबतीला असलेल्या परिचारिका यांनी संबंधित गरोदर मातेची तपासणी न करताच चंद्रपूर येथे प्रसूतीसाठी हलविण्याचे पत्र लिहिले होते. सोबतच तिला “प्रसूतीला उशीर होईल, लवकर घेऊन जा’ असा तगादा लावला होता.

या प्रकाराची माहिती प्रकाश भट यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना दिली असता त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून विचारणा केली असता. वणी रुग्णालयात सिझेरियन होत नसल्याचे सांगितले. मात्र साधारण प्रसूती होत असेल तर इथे करून घेता येईल असे ही ते बोलले. मात्र कर्तव्यावर असलेले प्रसूती तज्ञ रुग्णालयात आलेच नाही. ते स्वतःच्या खाजगी क्लिनिक मध्ये व्यस्त होते.

प्रातिनिधिक फोटो

काही वेळातच सदर मातेची सुखरूप सामान्य प्रसूती झाली. एकीकडे शासन गरोदर मातांना सेवा देण्यासाठी प्रयत्नात असताना इकडे रुग्णालयात असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी गरीब लोकांना चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात व्यस्त आहे. केवळ शहरातील खाजगी क्लिनिक मध्ये पाठविण्यासाठी येथील अधिकारी व परिचारिका मशगुल आहे. या प्रकाराची भट यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हाच प्रकार आणखी एका पेशन्टसोबत झाला. तिलाही खासगी रुग्णालयात सिजेरिअन प्रसूती करता रेफर करण्यात आले होते.

बालरोग तज्ज्ञ आलेच नाही…

रेफर केलेल्या दोन्ही मातांची सामान्य प्रसूती झाल्यानंतर त्या बाळाची तपासणी करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ येण्याची गरज होती. मात्र बाळाला तपासण्यासाठी येथील कार्यरत बालरोगतज्ज्ञ आलेच नसल्याची माहिती आहे. दोन दिवसात एकही भेट बालरोगतज्ञांनी दिली नाही. यावरून येथील महिला व त्यांच्या बाळाबाबत वैद्यकीय अधीक्षक किती तत्पर आहे हे स्पष्ट होत आहे.

वणी ग्रामीण रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथून बदलून आलेले डॉ चंद्रशेखर खांबे हे वैद्यकीय अधीक्षक होते. त्यांच्या काळात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रेफर केल्या जात नव्हत्या. विशेष म्हणजे सिझेरियनची व्यवस्था रुग्णालयात असल्याने सुखरूप प्रसूती सुरू होती. मात्र त्यांची बदली झाली अन वणी ग्रामीण रुग्णालयाला अवकळा आली. त्यांनाही येथील कार्यालयीन लिपिकाने त्रासून सोडले होते. केवळ आर्थिक फायद्यासाठी कार्यालयीन लिपिकाने राजकीय पॉवर वापरून तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांना जेरीस आणल्याचे प्रकार सुद्धा बघायला मिळाले होते.

डॉक्टरांमध्ये शिरलाये ‘कमिशन’ व्हायरस?

एक सिझेरियनचा खर्च साधारण 30 ते 35 हजार रुपये आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या मातांची तपासणी न करता थेट सिझेरियन असल्याचे सांगून रेफर केल्या जात आहे. एक आटोचालक ऐनवेळी व्यवस्था कुठून करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन येथील प्रशासन खासगी रुग्णालयाची चाकरी करीत असल्याने सामान्य लोकांना शासनाच्या सोयीसुविधांचा लाभ मिळत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

वणी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर सध्या खाजगी क्लिनिक मध्ये व्यस्त आहे. ग्रामीण रुग्णालयातून रेफर करून स्वतःच्या क्लिनिक मध्ये प्रसूती करायला भाग पाडत आहे. इकडे शासनाचा पगार घेत आहे. प्रसूती तज्ज्ञांची ड्युटी असताना ते गैरहजर असल्याचे येथे बघायला मिळाले आहे. एकाच वेळी दोन मातांना परिचारिकेने सिझेरियन असल्याचे सांगून रेफर लिहून दिले अन त्या दोघींची सुखरूप प्रसूती झाली हे वास्तव आहे.

कोरोनाचा वाढता आलेख बघून येथे प्रसूती साठी येणाऱ्या मातांची रुग्णालय प्रशासन स्वतःच्या फायद्यासाठी जणू अवहेलना करीत असल्याचे आरोप प्रकाश भट यांनी केले आहे. संबंधित प्रसूती तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मुख्य नर्स आणि वैद्यकिय अधिक्षकांवर संचारबंदी काळात प्रसूतीसाठी आलेल्या मातांना व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देत शासनाच्या आदेशाला पायदळी तुडविल्या प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.