दबावात शांततेत निर्णय घेणे बुद्धीबळ शिकवते – संजय खाडे

विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा 2023 चे थाटात उद्घाटन

वणी बहुगुणी डेस्क: बुद्धीबळ हा प्राचिन आणि अस्सल भारतीय खेळ आहे. बुद्धीबळ एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. दबावात देखील शांतपणे नियोजन करणे आणि निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते. मानवी जीवनात बळासोबत बुद्धीला देखील तेवढेच महत्त्व दिले आहे. मैदानी खेळ बळ वाढवते. तर बुद्धीबळ हे मानसिक स्वास्थ उत्तम करते. कोणत्याही वयाचा मनुष्य हा खेळ खेळू शकतो. त्यामुळे बुद्धीबळ सारख्या खेळांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. वणीत विदर्भस्तरीय स्पर्धा होणे ही एक अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन संजय खाडे यांनी केले. रविवारी वणीतील शेतकरी मंदिर येथे सकाळी 10 वाजता विदर्भस्तरीय बुद्धीबळ 2023 या स्पर्धेचे संजय खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मास्टर चेक अकाडमी तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारी होते. तर प्रमोद वासेकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, रामदास कांबळे, महादेव सोनटक्के, भास्कर ढवस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. संजय खाडे यांनी चेस बोर्डवर बुद्धीबळाची एक चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. पुरुषोत्तम आवारी यांनी अध्यक्षीय मनोगतात आयोजकांना शुभेच्छा देत परिसरात अशा स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा 2023 ही खुल्या गटात होत आहे. या स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध स्पर्धक हा 85 वर्षाचा असून सर्वात लहान स्पर्धक हा अवघ्या 5 वर्षांचा आहे. या स्पर्धेत विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील एकूण 190 स्पर्धक सहभागी झाले आहे. 8 राउंडमध्ये ही स्पर्धा होणार असून आंतरराष्ट्रीय नियम या स्पर्धेला लागू राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ठावरी यांनी केले. तर संचालन संतोष बेलेकर यांनी केले. मास्टर चेस अकाडमीचे संचालक मारोती कांडागुर्ले यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकाडमीची टीम परिश्रम घेत आहे.

Comments are closed.