जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयाच्या कोरोना नियंत्रण कक्षातर्फे आज गुरुवारी संध्याकाळी रुग्णांच्या सेवेसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. या हेल्पलाईनद्वारा आता लोकांना मोबाईलवरच समुपदेशन केले जाणार आहे. जर कुणावर कोरोनाचे प्राथमिक लक्षणं आढळल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरपोच जाऊन सेवा देखील देणार आहेत. सध्या अनेक जण कोरोनाबाधीत शहरातून वणीत आणि परिसरात आले आहेत. ते तपासणासाठी ग्रामीण रुग्णालयात येत आहे. दरम्यान नेहमीच्या रुग्णांचीही रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यात जर कुणाला कोरोनाची बाधा झाल्यास परिस्थिती अत्यंत चिघळू शकते. शिवाय एखाद्या डॉक्टरला संसर्ग झाल्यास परिस्थिती आटोक्यात राहणार नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या कोरोना नियंत्रण कक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
ही हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार गरजूंना 9420584695 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तर नेहमीच्या रुग्णांसाठी मोफत समुपदेशनासाठी 9527870004 , 9172868444 , 8007568467 , 9175551159 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या चार क्रमांकावर नेहमीच्या रुग्णांना साध्या आजारावर मार्गदर्शन केले जाणार आहे. जर रुग्णांमध्ये डॉक्टरांना कोरोनासदृश्य परिस्थिती आढळल्यास ते त्वरित घरपोच जाऊन उपचार देणार आहे. त्यासाठी कुणालाही रुग्णालयात येण्याची गरज नाही. जर परिस्थिती आणखीच गंभीर असेल तरच त्याला रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांनी काय करावे?
वणी तालुक्यात कोलगाव, कायर, राजूर, शिरपूर या चार पीएससी (प्राथमिक आरोग्य केंद्र) आहे. या पीएससीजवळ जे गाव येतात तिथल्या नागरिकांनी त्या पीएससीमध्ये जाऊन संपर्क साधावा. तसेच झरी आणि मारेगाव तालुक्यात येणा-या लोकांनी त्यांच्या परिसरातील पीएससीमध्ये भेट द्यावी. जर रुग्णामध्ये प्राथमिक लक्षणं आढळल्यास त्यानी त्यांच्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येईल. सध्या संपूर्ण परिसरातील लोकांची ग्रामीण रुग्णालयात गर्दी होत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही – डॉ. पोहे
संपूर्ण वणी शहर अद्यापही याबाबत गांभीर्याने घेत असताना दिसत नाहीये. शहरातील गर्दी कमी झाली असली तरी अनेक लोक ग्रामीण रुग्णालयात विनाकारण गर्दी करत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. नागरिकांना कोणताही उपचार हवा असल्यास त्यांनी हेल्पलाईनला संपर्क साधावा. त्यावरच त्यांना काय काळजी घ्यावी तसेच त्यावर कोणते औषध घ्यावे, कोणते उपचार करावे याचे मार्गदर्शन केले जाईल. जर रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणं दिसून आल्यास आरोग्य विभागाची टीम त्यांच्या घरी जाऊन तपासणी करेल. अद्यापही धोका टळला नसल्याने त्यांनी घराबाहेर पडू नये. तसेच गर्दी करू नये – डॉ. कमलाकर पोहे (वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय वणी )
वणीत 517 जण होम कॉरेन्टाईन
आज 89 लोकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले. यात मुंबईहून आलेले 3 पुण्याहून आलेले 43 व इतर शहरातून आलेल्या 43 लोकांचा समावेश आहेत. आता होम कॉरेन्टाईन झालेल्यांची संख्या 517 आहे. आज दुबईतून वणीत परत आलेल्या व्यक्तीलाही होम कॉरेन्टाईन करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांची निगरानी असणार आहे. याआधीच ग्रामीण रुग्णालयाने 15 लोकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारलेला आहे.