मार्डी येथील दारु दुकानाला ठोकले सील

दारूसाठी गावात भरायची तळीरामांची जत्रा

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दारूचे दुकान बंदचे आदेश असतानाही मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते.  परिसरातील दारूचे दुकानं बंद असल्याने इथे रोज तळीरामांची जत्रा भरायची. इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत आज गुरूवारी दुपारी प्रशासन घटनास्थळी पोहोचले व देशी दारू दुकान, बार व रेस्टॉरंटला सिल ठोकले.

जीवनावश्यक वस्तुचे दुकान वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. मात्र बंदच्या काळात अधिकच्या कमाईच्या मोहाने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मार्डीमध्ये अवैधरीत्या दारूची विक्री सुरू होती. परिसरात इतर दुकान बंद असल्याने गावात यात्रेचे स्वरुप आले होते.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका ओळखून मार्डी येथील सरपंच रविराज चंदणखेडे व पोलीस पाटील डॉ. पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन ही बाब तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र तालुका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर त्यांनी यवतमाळ येथील वरीष्ठ कार्यालयात सदर प्रकरणाची तक्रार केली. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आज दुपारी ही कारवाई केली.

ही कारवाई मारेगावचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भटकर यांच्या चमुसह सरपंच रविराज चंदणखेडे, पोलिस पाटील डॉ प्रशांत पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.